Teacher Constituency Election : उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद

शिक्षक मतदारसंघ निवडणूक : ८६ टक्क्यांवर मतदान : २ फेब्रुवारीला मतमोजणी
Teacher Constituency Election nagpur
Teacher Constituency Election nagpursakal

नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर विभागिय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले. किरकोळ घटनासोडता मतदान शांततेत पार पडले. शहरी भागातील केंद्रावर शिक्षक मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या.

त्यामुळे वेळ संपल्यावरही मतदानाची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे निवडणुकीत ८६.२३ टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मतदानासाठी शिक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र होते. निवडणुकीतील सर्व २२ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले असून २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी नागपूर विभागातील एकूण सहा जिल्ह्यांमध्ये १२४ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. यात नागपूर शहरात ८१ तर जिल्ह्यात ४३ मतदान केंद्रांचा समावेश होता. सकाळी आठ वाजतापासून शहरासह जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. मतदानात शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. केंद्रावर शिक्षकांच्या मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र होते. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्‍केवारी वाढल्याचे दिसत आहे.

शहरातील तहसील कार्यालय, ज्युपिटर कॉलेज, मोहता सायन्स, पं. बच्छाराज व्यास, माऊंट कार्मेल, नागसेन विद्यालय यासह शहरातील विविध केंद्रावर लांबच्या लांब रांगा असल्याचे दिसून आले. दुपारी २ वाजताच सुमारास ६०.४८ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता.

उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद

मात्र, दुपारनंतर त्यात आणखीत वाढ झाल्याचे दिसून आले. शेवटी ८६.२३ टक्क्यांची नोंद झाली. विशेष म्हणजे चार ही मतदानाची वेळ असतानाही किमान दीडशे ते दोनशे मतदार रांगेत मतदानासाठी उभे असल्याचे दिसून आले.

सीबीएसई शाळांनी दाखविला ठेंगा

शिक्षक मतदारसंघामध्ये यावेळी प्रथमच सीबीएसई शाळांमधील शिक्षकांचा मतदार म्हणून समावेश करण्यात आला. मात्र, बहुतांश सीबीएसई शाळांनी पूर्णवेळ शाळा ठेवल्याने मोठ्या प्रमाणात शिक्षकांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान अनेक राज्य मंडळाच्या शाळांनी शिक्षकांना सुटी नाकारल्याची माहिती समोर आल्याने शिक्षकांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याची वेळ आली.

काही शाळांनी स्वतः केंद्रावर नेण्यासाठी बसेसची व्यवस्था केली होती. तर काही शाळांनी मतदान झाल्यावर शिक्षकांना परत बोलविल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अशा शाळांवर प्रशासन काय कारवाई करते, हेच पाहणे महत्त्वाचे आहे.

आरोग्य सेवा

केंद्रावर आरोग्य सेवाही उपलब्ध करून देण्यात आली होती. येथे डॉक्टर, परिचर होते. नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयात बीपी तपासण्यात आले. अनेकांना याचा लाभ घेतला. तर महानगर पालिका केंद्रात एका मतदाराची प्रकृर्ती बरी वाटत नसल्याने त्याची तपासणी करून औषधी देण्यात आले.

बुथचे नियोजन फसले?

शिक्षक मतदरसंघात एरव्ही प्रत्येक केंद्रावर ५००ते ५५० मतदारांचा समावेश असताना, आज शहरतील तहसील कार्यालय, मोहता सायन्स, ज्युपिटर, नागसेन विद्यालय आणि इतर काही मोठ्या केंद्रांवर ९०० ते एक हजार मतदारांचा समावेश असल्याने गर्दी उसळली होती.

बराच वेळ शिक्षक उन्हात उभे असल्याने काही शिक्षकांना चक्कर आल्याचीही माहिती समोर आली. यावेळी पं. बच्छाराज व्यास विद्यालयात एका आमदाराने बुथवरुन मतदान केंद्राधिकाऱ्यांशी वाद घातला.

जिल्हानिहाय मतदान

  • नागपूर : ८१.४३ टक्के

  • वर्धा : ८६.८२ टक्के

  • चंद्रपूर : ९१.८९ टक्के

  • भंडारा : ८९.१५ टक्के

  • गोंदिया : ८७.५८ टक्के

  • गडचिरोली : ९१.५३ टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com