dogs
dogsSakal

मोकाट कुत्र्यांनी आणले नाकीनऊ

दिवसेंदिवस वाढतेय संख्या महापालिकेची लाचारी नागरिकांच्या मुळावर

नागपूर - शहरात मोकाट श्वानांवर नसबंदीची शस्त्रक्रिया बंद असल्याने त्यांची संख्या लाखावर गेली आहे. शहराच्या प्रत्येकच वस्तीमध्ये मोकाट कुत्र्यांनी एखाद्या तरी कुटुंबातील सदस्याला जखमी केले. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार श्वानांवर कारवाई शक्य नसल्याने महापालिकाही लाचार असून नागरिक, मुले श्वानांच्या तावडीत सापडत आहे. शहरात मागील वर्षीपर्यंत ८१ हजारांवर मोकाट कुत्रे होते. गेल्या एक वर्षापासून कोविडमुळे श्वानांवरील नसबंदी शस्त्रक्रिया बंद करण्यात आली. यातील चाळीस टक्के अर्थात ३२ हजार श्वानांची नसबंदी करण्यात आली होती. अर्थात गेल्या वर्षभरापासून ५९ हजार श्वान नसबंदीशिवाय आहेत. यात २५ हजारांच्या जवळपास मादी श्वानांची संख्या आहे. एका वर्षभरात एक मादी श्वान दोनदा पिलांना जन्म देते. एकावेळी एक मादी चार ते पाच पिलांना जन्म देते. परंतु यातील दोनच जिवंत राहतात, असे एका अधिकाऱ्याने नमूद केले. त्यामुळे गेल्या वर्षभरात पिलांना जन्म न देणाऱ्या दहा हजार मादी श्वानांचा अपवाद वगळला तर १५ हजार मादींनी वर्षभरात ६० हजार पिलांना जन्म देण्याची शक्यताही एका खाजगी शस्त्रक्रिया करणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधीने व्यक्त केली. त्यामुळे गेल्या वर्षभरात ६० हजार नव्या श्वानांसह शहरातील श्वानांची संख्या १ लाख ४० हजारांवर गेली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मोकाट श्वानांच्या वाढलेल्या संख्येने नागपूरकरांची चिंता वाढविली आहे. शहरात वाढलेल्या श्वानांनी आता चावा घेणेही सुरू केले आहे. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर शस्त्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. किशोर कुंभरे यांनी दहा महिन्यांपूर्वी सांगितले होते. परंतु कोरोनाची लाट ओसरली तरी नसबंदी शस्त्रक्रिया सुरू झालेल्या नाही. परिणामी वाढत्या श्वानांच्या संख्येने प्रत्येक वस्ती, मोहल्ल्यातील नागरिक त्रस्त आहेत. मागील महिन्यात नंदनवन परिसरात एका मुलीला कुत्र्याने जखमी केले. तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. गेल्या वर्षी जुलैमध्ये स्वावलंबीनगरात एका चिमुकल्याला चावा घेतला होता. याशिवाय पांढराबोडीतही अशीच घटना घडली. महापालिकेच्या एका सभेत माजी नगरसेविका डॉ. परिणिता फुके यांनी पोटतिडकीने हा विषय मांडला; परंतु प्रशासन व महापौरांनीही लाचारी व्यक्त केली.

६० वर नागरिकांना चावा

२०१८-१९ व २०१९-२० या दोन वर्षात प्रतिवर्ष २३ हजारांवर नागरिकांना चावा घेतला. अर्थात दररोज ६० नागरिकांना चावा घेतल्याचा पूर्वानुभव असतानाही मागील दोन वर्षांपासून शस्त्रक्रिया बंद आहेत. परिणामी श्वानांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून, कुत्रे नागरिकांच्या जिवावर उठले आहेत.

निधीअभावी रखडली नसबंदी

श्वानांच्या नसबंदी शस्रक्रियेकरिता निधीची गरज असून, त्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने पशुसंवर्धन विभागामार्फत राज्य शासनाकडे पाठविला. याबाबत मागील वर्षी बैठक झाली. परंतु कोरोनाची दुसरी लाट आल्याने राज्य सरकारकडून एकही रुपया निधी मिळाला नसल्याचे प्रशासनाने सभागृहात सांगितले होते.

शस्त्रक्रियेवर तीन वर्षात ९४ लाख खर्च

गेल्या वर्षभरात शस्त्रक्रिया बंद असली तरी त्यापूर्वी २०१७-१८, २०१९-२०, २०२०-२१ या तीन वर्षात शस्त्रक्रियेवर महापालिकेने ९४ लाख ४ हजार ५४४ रुपये खर्च केले. २०१८-१९ या वर्षांत शस्त्रक्रिया बंद होत्या. ९४ लाख रुपये खर्च करूनही शहरात दरवर्षी श्वानांची संख्या वाढत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com