पाण्यासाठी उलट्या बोंबा!

पंधरा वर्षे सत्ता भोगल्यानंतर भाजपला पाणीटंचाईचा साक्षात्कार
Water scarcity
Water scarcitysakal

नागपूर : चोवीस तास पाणी पुरवठ्याची सोय केल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला पंधरा वर्षानंतर प्रशासकाच्या कार्यकाळात शहरात पाणीटंचाई असल्याचा साक्षात्कार झाला आहे. शहरातील पाणीटंचाई संपली, एकही मोर्चा आता महापालिकेवर धडकत नाही, कोणी मडके फोडत नाही, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या भाजपच्या नेत्यांनाच आता महापालिकेवर मोर्चा काढण्याची वेळ आली आहे.

मागील आठ दिवसांपासून शहरातील ६० टक्के भागाला पाणी मिळत नसल्याने भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी उपमहापौर मनिषा धावडे, स्थायी समितीचे सभापती प्रकाश भोयर, बाल्या बोरकर यांच्यासह नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

वीज कंपनीकडून वारंवार ट्रिपिंग होत आहे. महापालिका व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समन्वयातून तोडगा काढणे आवश्यक आहे. ४०० नव्या बोरवेलचे तसेच टॅंकरचे व्यवस्थित नियोजन करावे. नगरसेवक प्रश्न सोडवित होते. परंतु, आता त्यांच्याकडे अधिकार नाहीत. प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कुणाचेच नियंत्रण राहिले नाही, असे नमुद करीत आमदार बावनकुळे यांनी आयुक्तांवर निशाना साधला.

पायलट प्रोजक्ट झोनमध्येच टंचाई

धरमपेठ झोनपासून सर्व प्रथम चोवीस बाय सेव्हन योजनेचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आला होता. टंचाईच्या शिष्टमंडळात याच झोनच्या बहुतांश नगरसेवकांचा समावेश होता. आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत महापालिका जलप्रदाय विभागाचे अधिकारी, ओसीडब्लूचे अधिकारी उपस्थित होते. शहरात नियमित असलेला जलपुरवठा महिन्याभरापासून वारंवार खंडित होत असल्याने नागपूरकर त्रस्त असल्याचे यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिले.

आयुक्तांच्या कक्षात वादळी चर्चा

विविध भागातील माजी नगरसेवकांनी ओसीडब्लूकडून वाढीव बिले पाठवली जात असल्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. बंडू राऊत, प्रदीप पोहाणे, प्रकाश भोयर यांनी वाढीव बिलाबाबत अधिकाऱ्यांची आयुक्तांपुढेच झाडाझडती घेतली. अधिकारी व माजी नगरसेवकांत चांगलीच वादळी चर्चा झाली. एवढेच नव्हे माजी नगरसेवकांनी झोनमधील पाणी समस्येच्या काळात अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्यावरूनही प्रशासनाला धारेवर धरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com