
काय स्थिती असेल तिची? सहा महिन्यांपूर्वी कोरोनाने पतीला तर आता गमावले दोन्ही जुळे मुलं
नागपूर : कोरोना (corona) महामारीने अनेक घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कोणी मुलगा गमावला, तर कोणी पतीला. तर कोणा अन्य नातेवाईकांना. मात्र, याही उपर कोणी पती तसेच मुलांना या कोरोना काळात गमावले. अशीच एक घटना दत्तवाडीत नुकतीच घडली. येथील रहिवासी मंगला मेश्राम यांच्या पतीचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले आणि आता अभियंता असलेल्या त्यांच्या जुळ्या मुलांचेही कोरोनाने बळी घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Twin brothers die of corona in rural Nagpur)
दत्तवाडीतील सत्यसाई सोसायटी येथील रहिवासी मंगला बंडू मेश्राम यांची २२ वर्षांची जुळे मुले गौरव व सौरभ या दोघांनाही कोरोनाने ग्रासले होते. दोघेही भाऊ अभियंता म्हणून कार्यरत होते. सहा महिन्यांपूर्वी पतीचे निधन झाले आणि आता दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने मृत मुलांची आई मंगला मेश्राम यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा: Success Story : तिखट मिरचीने केला ६० जणांचा संसार गोड; कोरोना काळातही बारमाही काम
सौरभचे शुक्रवारी (७ मे) निधन झाले तर गौरवचे मंगळवारी (११ मे) निधन झाले. दोघांनाही दहा दिवसांपूर्वी आठवा मैल येथील खासगी कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. त्याच दवाखान्यात दोघांचा मृत्यू झाला. पती पाठोपाठ दोन्ही मुलांना गमवावे लागल्याने मंगला मेश्राम या अक्षरशः शोकसागरात बुडाल्या आहेत. त्या माऊलीची काय मनस्थिती असेल, याची कल्पनाही करता येत नाही.
बहिणीला नाही विश्वास
त्यांना एक मुलगी आहे. दोन्ही भावांचा मृत्यू झाला यावर तिचा अजून विश्वास बसत नाही. दोन्ही भावडांवर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सौरभ व गौरव हे संगणक अभियंता होते. दोघेही पंजाबमधील मोहाली येथे आयटी कंपनीत नोकरीला होते. संचारबंदीमुळे दोघेही घरीच वर्क फ्रॉम होम करीत होते. गौरव व सौरभ यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
(Twin brothers die of corona in rural Nagpur)
Web Title: Twin Brothers Die Of Corona In Rural
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..