कोणी पाणी देता का पाणी? पावसाळ्यातही आठवड्यातून एकच दिवस टँकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water-Tanker

कोणी पाणी देता का पाणी? पावसाळ्यातही आठवड्यातून एकच दिवस टँकर

नागपूर : ‘पानी रे पानी ते रंग कैसा’ हे गाजलेले गाणे. पाण्याचा रंग कोणी सांगू शकत नाही. त्यात कोणातीही रंग मिसळला की तो रंग तयार होतो, असा त्याचा साधा अर्थ. नागपूर शहरात या पाण्याने सध्या ‘तहान’ रंग दाखविला आहे. पावसाळ्यातही लोकांना ‘पाणी द्या पाणी’ (water scarcity nagpur) अशी हाक द्यावी लागते. मात्र, त्यांच्या या हाकेला पालिका ‘ओ’ देईल काय (nagpur municipal corporation), हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचा: आता डेंगीचा धोका, एकाच महिन्यात २०० पेक्षा अधिक रुग्ण

आठवड्यातून एक दिवस टॅंकरने पाणी पुरवठा -

संत्रानगरी स्मार्ट होत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक वस्त्या पावसाळ्यातही तहानलेल्या आहेत. एकीकडे चोवीस तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असतानाही दक्षिण नागपुरातील अनेक वस्त्यांना आठवड्यातून केवळ एक दिवस टॅंकरने पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. नागरिकांना पावसाळ्यातही पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने चित्र आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचा दावाच पोकळ निघाल्याचे दिसून येते. प्रत्येक घरांपुढे ड्रमच्या रांगा दक्षिण नागपुरातील नागरिकांची पाण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड अधोरेखित करीत आहे.

१५ वर्षे जुन्या वस्त्यांत ठणठणाट -

शहर विकसित होत असताना विकासाचे समान सूत्र मात्र बिघडल्याचे उत्तम नमुना म्हणजे दक्षिण नागपूरला म्हणता येईल. या भागात पंधरा ते वीस वर्षे जुन्या वस्‍त्यांत अद्यापही पिण्याचे पाणी पोहोचले नाही. नागरिकांना भर पावसातही पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सिद्धेश्वरी नगर, चक्रपाणी नगर, मेहरधाम, भगवती नगर, न्यू अमर नगर, गजानन नगरासह या परिसरातील अनेक वस्त्या गेल्या पंधरा वर्षांपासून तहानलेल्या आहेत. वस्त्यांतील अनेकांकडे विहिरी आहेत. परंतु, आता घरांची संख्या वाढल्याने विहिरींची पातळी खोल गेली. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच बाहेर वापरण्यात येणारे पाणीही मोजून वापरावे लागत आहे. महापालिकेकडून या नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. परंतु, हा पाणीपुरवठा आठवड्यातून एकच दिवस होतो. परिणामी नागरिकांना आठ दिवस पाणी साठवून ठेवावे लागते. त्यामुळे पाणी जलजंतू झाले तरीही तेच पाणी वारंवार उकळून प्यावे लागते. टॅंकरचे पाणी शुद्ध असल्याने काहीजण उकळून पीत नाही. आठ दिवसांच्या पाण्यामुळे नागरिक आजारीही होतात.

जलवाहिन्यांचे जाळे, पण जलकुंभच नाही -

या वस्त्यांमध्ये जलवाहिन्यांचे जाळे टाकण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. काहींनी लवकरच नळाचे पाणी मिळेल, अशी अपेक्षा सिद्धेश्वरीनगरातील निरंजन मून यांनी व्यक्त केली. दक्षिण नागपूरसाठी सात जलकुंभ मंजूर करण्यात आले. परंतु एकाही जलकुंभाचे काम अद्याप पूर्ण झाली नसल्याचे मनपातील सूत्राने नमूद केले. जलकुंभच नसल्याने पाणी कुठून मिळणार? आणखी किती दिवस आठ दिवसातील एका टॅंकरवर नागरिकांना दिवस काढावे लागतील? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

घर बांधून पंधरा वर्षे झाली. गेल्या पाच वर्षांपासून यंदा नळ येईल, असे ऐकत आहे. परंतु, अद्यापही नळ नाही. दोन घरांसाठी आठ दिवसांतून एकदिवस टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. ड्रममध्ये पाणी ठेवले जाते. आठ दिवस तेच पाणी वापरावे लागत आहे. भगवतीनगरपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली. पण अजून पाणी आले नाही. पाण्यासाठी खूपच डोकेदुखी करावी लागत आहे. उन्हाळ्यात विहिरींचेही पाणी कमी होते. परंतु, टॅंकरमध्ये वाढ होत नाही.
- दीपक चौधरी, सिद्धेश्वरीनगर.
उन्हाळ्यात पाण्याची मोठीच समस्या आहे. विहिरीचे पाणी कमी झाल्यानंतरही टॅंकरने मर्यादित पाणीपुरवठा होते. त्यामुळे अनेक नागरिक बाजूच्या सार्वजनिक विहिरीवरून पायपीट करीत पाणी भरतात. पाण्यासाठी एक दोन दिवस अनेकांचा रोजगारही जातो. उन्हाळ्यात आठ दिवसांतून दोन टॅंकरने पाणीपुरवठा होते. तेही केवळ पिण्यासाठीच पाणी मिळते. इतर वापरासाठी वणवण भटकावे लागत आहे.
-सचिन दोनोडे, चक्रपानीनगर.

Web Title: Water Supply Though Tanker Even In Monsoon Season In Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nagpur