
Weather Update : गारांसह पावसाची हजेरी; दुपारनंतर घामाच्या धारांपासून दिलासा
नागपूर : शहराच्या विविध भागांमध्ये दुपारी तीन ते चार वाजतादरम्यान गारांसह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सकाळपासून उन्हामुळे त्रस्त नागपूरकरांना दुपारी दिलासा मिळाला. गेल्या तीन दिवसात आज दुसऱ्यांदा पाऊस पडला.
गुरुवारी सायंकाळी वादळासह पावसाने संपूर्ण शहराला झोडपले. शुक्रवारी उसंत दिल्यानंतर आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले. काही वेळातच पावसाने हजेरी लावली. बेसा, बेलतरोडी, गोधनी या भागात जोरदार पाऊस झाला. शहरातील वर्धा रोडवर छत्रपती चौक, त्रिमूर्तीनगर, स्वावलंबीनगर भागात सुपारीएवढ्या गाराही पडल्या.
त्यामुळे रस्त्यांवरील दुचाकीस्वारांनी बचावासाठी आडोसा शोधला. लहान मुलांनी कुतूहलाने गारा भांड्यामध्ये साठवण्याचाही प्रयत्न केला. काही भागांमध्ये वादळासह पाऊस आल्याचेही नागरिकांनी सांगितले. परंतु कुठेही गुरुवारप्रमाणे झाडांची पडझड झाली नाही. वाठोडा, डायमंडनगर, खरबी परिसरात काही काळासाठी वीजपुरवठा खंडीत झाला. परंतु काही वेळातच तो सुरळीत झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा प्रभाव
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शनिवारपासून नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह वादळी पाऊस व गारपिटीचाही इशारा प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. हवामान विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ च्या प्रभावामुळे विदर्भात जोरदार पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. त्यामुळे गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.