
Weather update : नागपूरकरांना दिलासा ;पाऱ्याने एकदाही गाठली नाही ४५ ची पायरी
नागपूर : विदर्भातील कडक उन्हाळा म्हटला की अंगावर काटे येतात. या ''घामफोड''णाऱ्या दिवसांत कुणीही पाहुणपणासाठी विदर्भात येण्याची हिंमत करीत नाही. दरवर्षी पारा ४६-४७ डिग्रीपर्यंत जातो. मात्र नागपूरकरांसाठी यंदाचा उन्हाळा फार मोठा दिलासा घेऊन आला. यावर्षी नागपूरच्या तापमानाने एकदाही ४५ ची पायरी गाठली नाही. ऊन-सावल्यांच्या खेळ रंगल्याने हा उन्हाळा या दशकातील दुसरा सर्वाधिक थंड उन्हाळा ठरला.
नवतपासोबतच विदर्भातील उन्हाळा संपून हळूहळू मॉन्सूनचे वेध लागते. आश्चर्याची बाब म्हणजे काही दिवसांचा अपवाद वगळता यंदा नागपूरकरांना उन्हाळा जाणवलाच नाही. चार महिन्यांत एकदाही नागपूरचा पारा ४५ अंशांवर गेला नाही. गेल्या १४ मे रोजी नोंद झालेले ४३.३ डिग्री तापमान नागपूरचे यंदाचे सर्वाधिक तापमान ठरले. हा एकमेव अपवाद वगळता यंदा उन्हाचे चटके जाणवलेच नाही.
विदर्भातील ''हॉट सिटी'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला, अमरावती, चंद्रपूर व अन्य एक-दोन जिल्ह्यांमध्ये ४५ किंवा त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली. संपूर्ण विदर्भातच उन्हाळाभर ऊन-सावल्यांचा खेळ राहिला.
‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’, बंगालच्या उपसागरात वारंवार निर्माण झालेल्या ''सिस्टिम्स'' आणि चक्रीवादळामुळे विदर्भात राजस्थानकडून फारशा उष्णलाटा आल्या नाहीत. अवकाळी पावसाने अधूनमधून नियमित हजेरी लावून त्यात बाधा आणली. उन्हाची तीव्रता कमी होण्याचे हे मुख्य कारण ठरले. ‘ग्लोबल वॉर्मिंग''मुळेदेखील वातावरणावर विपरित परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय म्हणजे, मार्च, एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या तिन्ही महिन्यांमध्ये अवकाळी पावसाने विदर्भात हजेरी लावली.
अवकाळी पावसाची हजेरी
नागपूरच्या गेल्या दहा वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास यावर्षीचा उन्हाळा कमी तापदायक ठरला. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२१मध्ये नागपूरचे कमाल तापमान ४३.९ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यानुसार, विदर्भातील उन्हाची लाट मुख्यत्वे राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांवर अवलंबून असते. कोरडे वातावरण असेल तरच उष्णलाट येऊन तापमानात वाढ होते. या उन्हाळ्यात ते चित्र पाहायला मिळाले नाही. अवकाळी पावसाची अधूनमधून हजेरी हे उन्हाची तीव्रता कमी होण्याचे हे मुख्य कारण ठरले.