esakal | व्हॉट्सअ‌ॅप ग्रुप आले रुग्णांसाठी धावून, एका टचवर मिळतेय गरजूंना माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

file image

व्हॉट्सअ‌ॅप ग्रुप आले रुग्णांसाठी धावून, एका टचवर मिळतेय गरजूंना माहिती

sakal_logo
By
केतन पळसकर

नागपूर : बेड अव्हेलेबल आहे का.. तातडीने रेमडेसिव्हिर हवे होते... कोणाजवळ ऑक्सिजन सिलिंडरवाल्यांचा नंबर आहे का?.. दादा रेमडेसिव्हिर नको, शववाहिनीवाल्यांचा नंबर तेवढा द्या आता... या ना अशा अनेक मन हेलावून टाकणाऱ्या संदेशानी व्हॉट्सअ‌ॅ ग्रुप खणखणत आहेत. गरजूंना मदत म्हणून काही तरुणांनी व्हॉट्सअ‌ॅप ग्रुप स्थापन केले आहेत ज्या माध्यमातून गरजूंना मदतही मिळते आहे.

हेही वाचा: आता चक्क कार्यालयासमोरच होणार कोरोना चाचणी, पॉझिटिव्ह आढळल्यास गुन्हा दाखल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील रुग्णांचा दररोजचा आकडा सरासरी ६ हजारांच्या घरात गेला आहे. शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असतानाच रुग्णांची होणारी गैरसोयही वाढली आहे. ही बाब लक्षात घेता शहरातील काही तरुणांनी व्हॉट्सअ‌ॅपचा आधार घेत मदतीसाठी ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून गरजूंना आवश्यक मदत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न सदस्यांकडून केला जातो आहे. रुग्णासाठी लागणाऱ्या औषधांपासून ते जेवणाच्या डब्यापर्यंत सर्व ती मदत या ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

हेही वाचा: उद्योजकांनो! आता अधिकच्या वीजबिलातून होणार सुटका, तरुणांनी शोधलीय भन्नाट आयडिया

या दिवसांमध्ये अनेकांना आपल्या बाधित नातेवाइकांना उपचारासाठी खाटा मिळाव्यात म्हणून वणवण भटकावे लागत आहे. मात्र, व्हॉट्सअ‌ॅप ग्रुपमुळे एका टचवर ही माहिती गरजूंना उपलब्ध होते आहे. त्यामुळे, रुग्णालयाच्या येरझाऱ्या कमी झाल्या. तसेच, लागणारा वेळ आणि सहन करावा लागणारा मनस्ताप देखील कमी झाला आहे. या प्रयत्नातून रुग्णांच्या नातेवाइकांना मोठा धीर प्राप्त होतो आहे. डिजिटलच्या जमान्यात मदत करण्याची आणि एकमेकांसाठी धावून जाण्याची पद्धत बदलल्याच्या चर्चा ज्येष्ठांमध्ये रंगत आहेत.

माझ्या मित्राच्या परिवारातील आठ जण आठ महिन्यात कोरोनामुळे दगावले. या परिस्थितीमुळे आम्ही अस्वस्थ होतो. त्यामुळे, व्हॉट्सअ‌ॅप ग्रुप सुरू करण्याची कल्पना सुचली. मित्राने पुण्यात आणि मी नागपूर येथून हा ग्रुप सुरू केला. कोरोनामध्ये वेळ खूप महत्त्वाची आहे. या ग्रुपमुळे फोन नंबर का होईना पण मदत मिळते आहे.
-समीर आचार्य, कोविड मेडिकल हेल्प ग्रुप