Nagpur Crime : 'अंत्यविधीला का गेलीस?' नवऱ्याने संतापच्या भरात ढकलून दिले, पत्नीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

Nagpur Crime : 'अंत्यविधीला का गेलीस?' नवऱ्याने संतापच्या भरात ढकलून दिले, पत्नीचा मृत्यू

नागपूर - सक्करदरा पोलिस हद्दीत सोमवारी क्वार्टर परिसरात राहणाऱ्या पती-पत्नीच्या झालेल्या भांडणातून धक्का दिल्याने पत्नीचा खाली पडून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रशांत विठ्ठलराव गोंडाणे (वय ५५) असे आरोपी पतीचे नाव असून कश्‍मा प्रशांत गोंडाणे असे मृत पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी गोंडाणे यांच्या नातेवाईकांकडे एकाचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीला कश्‍मा गोंडाणे (वय ४५) या गेल्या होत्या.

दरम्यान रात्री दहा वाजता त्या घरी परतल्या. त्या घरी येताच पती प्रशांत यांनी अंत्यविधीला का गेली? असा प्रश्‍न उपस्थित करुन वाद घातला व शिवीगाळ केली. त्यांच्यात जोरदार भांडण सुरू झाले. त्यातून प्रशांत यांनी त्यांना धक्का दिला. त्यातून त्या खाली पडल्या आणि बेशुद्ध झाल्या. त्यानंतर मुलाने त्यांना खासगी हॉस्पिटल आणि तिथून मेडिकल ट्रामा सेंटर येथे नेले. दरम्यान १८ मे रोजी सकाळी दहा वाजता उपचारादरम्यान त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

वैद्यकीय सूचनेवरून पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली. मात्र, अकस्मात मृत्युच्या चौकशीत नातेवाईकांनी दिलेल्या साक्षीनुसार पतीशी झालेल्या भांडणात रागाच्या भरात ढकलल्याने त्या खाली पडल्याने बेशुध्द होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला.