
Yin Summer youth summit 23 संधीचे सोने करून जगा आनंदी
नागपूर : आवडीच्या विषयात शिक्षण घेऊन करिअर केल्यास माणूस समाधानी होतो. मात्र आईवडिलांच्या महत्वाकांक्षेतून आपल्याला आवड नसलेल्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळाली, तरी त्या संधीचे सोने करण्याची किमया साधून समाधान मानावे आणि आनंदी जीवन जगावे, तरच मिळालेल्या आयुष्याचे सार्थक होत असल्याची भावना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक तसेच सहयोगी प्राध्यापक डॉ. अविनाश गावंडे यांनी व्यक्त केली.
‘यिन’च्या ‘चला घडू या देशासाठी’ या समर युथ समीटमध्ये डॉ. गावंडे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, आयुष्यासमोर मोठी आव्हाने आहेत, मात्र आजची पिढी नशीबवान आहे. स्मार्ट तंत्रज्ञानाच्या वापराची संधी या पिढीला मिळाली. डिजिटल क्रांतीमुळे आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडून आलेले आहेत.
राहणीमान उंचावले आहे, मात्र कुटुंबातील नात्याचे नुकसान झाले. मोबाईलमुळे आई वडील आणि मुले, या नात्यातील संवाद हरवला आहे. पूर्वीच्या काळी कुटुंबांतील एकमेकांच्या सुखःदुखाचे ओझे आपण वाहत होतो, त्यामुळेच अमिताभ बच्चन एका सिनेमात सारी दुनियाका बोझ हम उठाते है..
असे म्हणत असला, तरी त्यात समाधानी आयुष्याचा संदेश होता. अलीकडे मोबाईल ही गरज बनली आहे, मात्र या गरजेचा वापर आयुष्य उद्ध्वस्त होईपर्यंत करू नका. करियर करताना पैसा की, समाधान याचे गणित मांडताना पैशापेक्षा समाधान महत्त्वाचे आहे, याकडे लक्ष द्यावे, असे डॉ. गावंडे म्हणाले.