१६३ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

नागपूर - कार्यालयीन वेळेत कर्तव्यावर उपस्थित न राहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या १६३ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. शनिवारी नोटीस हातात पडताच कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले.

नागपूर - कार्यालयीन वेळेत कर्तव्यावर उपस्थित न राहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या १६३ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. शनिवारी नोटीस हातात पडताच कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले.

जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत कर्तव्यावर उपस्थित राहण्याच्या सूचना वारंवार दिल्या. यानंतरही कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले. बऱ्याच विभागातील कर्मचारी उशिराने कार्यालयात येत असल्याचे चित्र होते. कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांची कामे वेळेवर होत नव्हती. त्यामुळे तक्रारींमध्ये वाढ झाली.

आठवडाभरापूर्वीच जनमंचच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला भेट दिली असता विविध विभागातील कर्मचारी वेळेत कार्यालयात उपस्थित नव्हते. 

त्यानंतर सीईओ बलकवडे यांनी सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांचे हजेरी रजिस्टर बोलावून चेक केले. त्यात १६३ कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याची बाब पुढे आली.

लेटलतीफ कर्मचाऱ्यांना वचक लावण्यासाठी १६३ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच कार्यालयात उशिरा येण्यामागील कारण आठ दिवसांत देण्याचे निर्देश दिले. नोटीसचे उत्तर काय द्यायचे याच विचारात कर्मचारी होते. काहींनी हे केवळ महिनाभरच चालेल असे म्हणत  दुर्लक्ष केले.

नियमित होणार हजेरी रजिस्टरची तपासणी
कर्मचाऱ्यांना कार्यालयात उशिरा येण्याची सवय मोडून काढण्यासाठी दररोज सकाळी १०.३० वाजतानंतर कर्मचाऱ्यांच्या हजेरी पत्रकाची तपासणी करण्यात येणार आहे. सीईओ बलकवडे यांनी सर्व विभागप्रमुखांना तशा सूचना दिल्या असून, दररोज सकाळी १०.३० नंतर हजेरी पत्रक पाठविण्याचे निर्देश दिले. नेहमी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्याचे निर्देश दिले. आठ दिवसांत सर्व विभागात बॉयोमेट्रिक मशीन लावण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे.

Web Title: nagpure vidarbha news 163 employee notice