मंदुरा रेल्वे स्थानकावर विद्यार्थ्यांनी रोखली नागपूर भुसावळ पॅसेंजर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

तालुक्यातील मंदुरा हे सर्वात छोटे रेल्वे स्टेशन आहे. प्रवासी संख्या व उत्पन्न कमी असल्याच्या कारणावरून हे रेल्वे स्थानक बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.

मूर्तिजापूर : मध्य रेवेच्या मुंबई-हावडा लोहमार्गावरील या तालुक्यातील मंदुरा रेल्वे स्थानकावर विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी नागपूर-भुसावळ पॅसेंजर आज (ता. १०) सकाळी दहाच्या दरम्यान अर्धातास रोखून धरली. उद्या (ता.११) पासून थांबा बंद करण्याची सूचना रेल्वे प्रशासनाने प्रदर्शीत केली असून प्रत्यक्षात मात्र काल (ता. ९) पासूनच येथील पॅसेंजरचा थांबा बंद करण्यात आला आहे. 

तालुक्यातील मंदुरा हे सर्वात छोटे रेल्वे स्टेशन आहे. प्रवासी संख्या व उत्पन्न कमी असल्याच्या कारणावरून हे रेल्वे स्थानक बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. या निर्णयाविरुद्ध येथील विद्यार्थ्यांनी व पालकांनी आज नागपुर-भुसावळ पॅसेंजर साखळी ओढून सुमारे आर्धा तास रोखून धरली.

या स्थानकावरून परिसरातील पोता, मंदुरा आदी गावांमधील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी मूर्तिजापूर येथे येतात त्यांना येथे येण्या जाण्यासाठी पॅसेंजर गाडी हाच एकमेव पर्याय आहे. पॅसेंजरचा थांबा बंद झाला तर या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. कारण कच्च्या रस्त्याने तालुक्याशी जोडल्या गेलेल्या या गावात बससेवा सुद्धा उपलब्ध नाही.

 हे रेल्वे स्थानक ब्रिटिश कालीन असून मध्यंतरीच्या काळात बंद करण्यात आले होते परंतु तत्कालीन केंद्रीय मंत्री गुलामनबी आझाद यांनी या रेल्वे स्थानकाचे रितसर उद्घाटन करुन अडगळीत पडलेले स्टेशन पुन्हा सुरू केले होते. परंतु रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा पॅसेंजर गाडीचा येथील थांबा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांची ची कुचंबणा झाली आहे, येथील थांबा बंद करु नये अशी संतप्त ग्रामस्थांची भूमिका आहे.

हा थांबा बंद न करण्याची विनंती करणारे निवेदन विद्यार्थ्यांनी भुसावळ रेल्वे मंडळाचे डीआरएम रामकुमार यादव यांना पाठविले आहे.

Murtijapur

मंदुरा हे ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानक आहे. मूर्तिजापूर ते बडनेरा या ५० किमी अंतरादरम्यान एक्स्प्रेस गाड्यांना पास देणे आणि गाड्यांची संख्या वाढविण्याच्या हेतूने माना, मंदुरा, कुरूम व टाकळी स्थानंकांचे निर्माण झाले आहे व या चारही ठिकाणी पॅसेंजरचा थांबा आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थांना त्यामुळे दळणवळणाची सुविधा आहे, मात्र हा थांबा बंद करण्याच्या निर्णयाने हवालदिल झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलक पावित्रा घेतल्याचे समजते.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Nagpurs Bhusawal Passenger stopped at Mandwara Railway Station By Students