मराठीसाठी नागपूरचे बलिदान मोठे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 जानेवारी 2019

नागपूर : मराठीकरिता जे बलिदान नागपूरने दिले, ते अन्य कुठल्याही शहराने दिलेले नाही. एका हिंदी भाषक प्रांताची राजधानी असलेले नागपूर, मराठी भाषक मुलूख तयार झाला पाहिजे म्हणून उपराजधानीचा दर्जा स्वीकारून महाराष्ट्रात सामील झाले. भाषेकरिता एवढे मोठे बलिदान दुसऱ्या कुठल्याही शहराने दिल्याचा इतिहास नाही. त्यामुळे जागतिक मराठी संमेलनासाठी योग्य ठिकाण, असे प्रतिपादन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील विदर्भवाद्याची प्रचिती दिली.

नागपूर : मराठीकरिता जे बलिदान नागपूरने दिले, ते अन्य कुठल्याही शहराने दिलेले नाही. एका हिंदी भाषक प्रांताची राजधानी असलेले नागपूर, मराठी भाषक मुलूख तयार झाला पाहिजे म्हणून उपराजधानीचा दर्जा स्वीकारून महाराष्ट्रात सामील झाले. भाषेकरिता एवढे मोठे बलिदान दुसऱ्या कुठल्याही शहराने दिल्याचा इतिहास नाही. त्यामुळे जागतिक मराठी संमेलनासाठी योग्य ठिकाण, असे प्रतिपादन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील विदर्भवाद्याची प्रचिती दिली.
जागतिक मराठी अकादमीच्या वतीने आयोजित 16व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, स्वागताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, महापौर नंदा जिचकार, माजी खासदार दत्ता मेघे, माजी खासदार अजय संचेती, संमेलनाचे संयोजक गिरीश गांधी, राजीव मंत्री, शशिकांत चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी अनेक लोक कार्यरत आहेत. प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला नक्की यश येईल, असे सूतोवाचही मुख्यमंत्र्यांनी केले. संमेलनाला आल्यावर नागपूरला आल्याचा आनंद मिळाला. कारण, नागपूरमध्ये कार्यक्रमाची वेळ एक वाजताची असेल, तर प्रमुख पाहुण्यांनी दीड वाजता यायचे असते आणि लोकांनी दीड वाजता यायचे असते. या संस्कृतीचे पालन करत आम्ही एक वाजताच्या कार्यक्रमाला दीड वाजता आलो आणि आपल्यापैकी पन्नास टक्के लोक दोन वाजता आले. त्यामुळे नागपूरचा कार्यक्रम आहे, यावर शिक्कामोर्तब झाले, अशी मिष्किली मुख्यमंत्र्यांनी केली. संमेलनाध्यक्ष डॉ. ठाणेदार यांच्या "ही श्रींची इच्छा' आणि "श्रीगणेशा' या पुस्तकांचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले.
मराठीबाबत अस्मितेची उणीव
तमिळ अस्मिता किंवा कन्नड अस्मिता कौतुकास्पद ठरते. पण, मराठी माणसाला मराठीबाबत अस्मितव नाही, अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. अशा संमेलनांमध्ये विद्यापीठाचा मराठी विभाग, शिक्षक, प्राध्यापक यांना सामावून घ्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सुशीलकुमार शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक
नागपूरचे लोक फार दिलदार आहेत. ते खाऊ घालायला तर मुळीच कमी करीत नाहीत. आता तर शहराचा माणूस मुख्यमंत्री झाल्यापासून पैसाही सोडायला तयार नाहीत. असो. पण मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत, या शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. हिवाळी अधिवेशनाबद्दल ते म्हणाले की, मला सांगण्यात आले की इथे थंडी आहे. म्हणून मी मुद्दाम कोट घालून आलो. पण, इथे थंडीच नाही. पूर्वी डिसेंबरमध्ये आमची अधिवेशने व्हायची. थंडीची मजा करायला लोक इथे यायचे. मला माहिती आहे, मुख्यमंत्र्यांनी वेळ बदलली. पण, मी चाळीस वर्षे राजकारणात आहे. वसंतराव नाईकांच्यापासून मंत्रिमंडळात होतो. दिल्लीत जाईपर्यंत दरवर्षी डिसेंबरमध्ये इथे यायचो, संत्री खायचो, सकाळी फिरायला जायचो.

Web Title: Nagpur's sacrifice for Marathi is big