नायब तहसीलदार, तलाठ्याला लाच घेताना अटक

File photo
File photo

भद्रावती (जि. चंद्रपूर) : भद्रावतीचे नायब तहसीलदार गौतम शंभरकर आणि तलाठी अंकुश मस्के या दोघांना एका ट्रॅक्‍टरचालकाकडून लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता करण्यात आली.
भद्रावती येथील ट्रॅक्‍टरमालक घोटेकर यांचे ट्रॅक्‍टर नायब तहसीलदार शंभरकर यांनी पकडले. त्यानंतर ट्रॅक्‍टर सोडविण्यासाठी घोटेकर यांना लाच मागितली. त्यानुसार पाच हजार रुपयांची रक्कम तहसील कार्यालयातील शंभरकर यांच्या कक्षात देण्याचे ठरले. दरम्यान, याची तक्रार घोटेकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चंद्रपूर कार्यालयात केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. साडेचारला ठरल्याप्रमाणे घोटेकर यांनी शंभरकर यांना लाचस्वरूपात पैसे दिले. त्यावेळी शंभरकर आणि त्याच्यासोबत असलेल्या मस्के या दोघांनाही रंगेहाथ अटक करण्यात आली. शंभरकर भद्रावती तहसील कार्यालयात तर मस्के शेगाव (खुर्द) येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे.
दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर लाचेचा गुन्हा
वर्धा : कारवाई टाळण्याकरिता दारूविक्रेत्याला एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वर्ध्यातील रामनगर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर लाच स्वीकारण्यास तयारी दर्शविल्यावरून रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी (ता. 1) सायंकाळी करण्यात आली. कुणाल कांबळे (वय 27) आणि ताबीज बेग (वय 28) असे या पोलिसांचे नाव आहे. या दोघांनी येथील एका दारूविक्रेत्याला हजार रुपयांची मागणी केली होती. याची तक्रार या दारूविक्रेत्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीवरून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com