नाव वगळले आणि भोंगळे पाझारेंवर संतापले...

file photo
file photo

चंद्रपूर, : समाज कल्याण सभापती बिरजू पाझारे आणि समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव यांची जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी चांगलीच कानउघाडणी केली. एका कार्यक़्रमाच्या मुख्य बॅनवरून भोंगळे यांचे नावच गायब करण्यात आले. त्यामुळे ते संतप्त झाले. शेवटी या दोघांनीही आपली चूक कबुली केली आणि वेळेवर दुसरे बॅनर तयार करून लावण्यात आले. तेव्हा भोंगळेंचा पारा शांत झाला.
चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात काल बुधवारला दिव्यांगांना स्वयंचलित तीनचाकी सायकलींचे वाटप राज्याचे अर्थ,वन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक़्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले. समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते. कार्यक़्रमाला आमदार नाना शामकुळे, वन विकास मंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार अतुल देशकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपाचे सभापती राहुल पावडे आदींची उपस्थिती होती. या सर्वांची नावे कार्यक़्रमस्थळी लावलेल्या बॅनरवर होते. अपवाद फक्त जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांचा. मुनगंटीवार येण्यापूर्वीच भोंगळे कार्यक़्रम स्थळी पोहचले. तेव्हा बॅनरवरून भोंगळे यांचे नाव वगळण्यात आल्याचे एकाने लक्षात आणून दिले. शिष्टाचारानुसार अध्यक्ष या नात्याने त्यांचे नाव आवश्‍यक होते. त्यामुळे देवराव भोंगळे संतप्त झाले. त्यांनी सभागृहातील मंचाच्या मागे समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव यांना बोलाविले आणि त्यांना चांगलेच झापले. तेव्हा पाझारेही तिथे पोहचले. त्यांनाही भोंगळेंनी खडे बोल सुनावले. मी अध्यक्ष असताना बॅनवरून नाव कसे काय काढण्यात आले, अशी विचारणा केली. तेव्हा दोघांनीही आमची चूक झाली, अशी कबुली दिली. त्यानंतर दुसरे बॅनर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ते बॅनर आल्यानंतर जुने काढून नवे लावण्यात आले. यासाठी सभागृहातील रंगमंचाचा पडदाही पाडण्यात आला होता. त्यानंतर भोंगळे नरमले झाले. दरम्यान थोड्याच वेळात मुनगंटीवार पोहचले आणि कार्यक़्रमाला सुरवात झाली.
एरवी शांत स्वभावाचे म्हणून भोंगळे ओळखले जातात. मात्र काल त्यांचे रौद्र रूप बघून अधिकारी आणि भाजपचे कार्यकर्तेही अचंबित झाले. विशेष म्हणजे भोंगळे आणि पाझारे मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक आहे. दोघेही एकाच भागातील आहे. मात्र सध्या त्यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. त्यातूनच भोंगळे यांचे नाव बॅनरवरून वगळण्यात आले, असावे अशी शंका व्यक्त केली जात आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com