शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नाना पटोलेंचा ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

भंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी शेतकरी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घालण्यासाठी जिल्हा परिषद सभागृहासमोर ठिय्या मांडला. तत्पूर्वी, नियमांचे उल्लंघन करीत सभागृहात सुरू असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत प्रवेश केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सभेनंतर पालकमंत्र्यांनी निवेदन स्वीकारून मागण्यांसंदर्भात चर्चा केली.

आज, गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पालकमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित केली होती. जिल्ह्यातील धानउत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना घेऊन नाना पटोले यांनी पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला होता. यामुळे जिल्हा परिषदेच्या चारही बाजूंनी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पटोलेंनी भिंतीवरून उडी घेऊन जिल्हा परिषद परिसरात प्रवेश केला व थेट पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसंदर्भात जाब विचारला. पालकमंत्र्यांनी त्यांची समजूत काढीत मागण्यांसंदर्भात चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतरही पटोलेंनी शेतकरी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सभागृहासमोरच ठिय्या मांडला.
सभेनंतर पालकमंत्री बावनकुळे यांनी नाना पटोलेंच्या आंदोलनाला भेट देत मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी खरेदी केंद्रावर मागील तीन महिन्यांपासून धान पडून असून खरेदी करण्यात आली नाही. धानाचे चुकारे अडलेले आहेत. 16 तास वीजपुरवठा देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, सहा तास वीजपुरवठा सुरू राहत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मागील पाच महिन्यांपासून पैसे मिळाले नाहीत. रोजगार हमी योजनेच्या मजुरांना मजुरी मिळाली नाही व विविध मागण्यांवर चर्चा केली. यासंदर्भात सकारात्मक आश्‍वासन पालकमंत्र्यांनी दिले.
कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी
आंदोलनादरम्यान सत्ताधारी व विरोधकांनी घोषणाबाजी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. सत्ताधारी व विरोधकांना पोलिस समजावून शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याने भाजपला उद्देशून शिवीगाळ केली. त्यामुळे चिडलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले.

Web Title: nana patole agitation