सरकारला काहीच वाटत नाही का? नाना पटोलेंचा सवाल (व्हिडिओ) 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

यावेळी शेतकऱ्यांनी हलके धान कापणी केली असून कळपा शेतात ठेवल्या होत्या. पावसाने भिजलेल्या पिकाला कोंब आले आहेत. यापासून तांदूळ तयार करता येणे अशक्‍य झाले आहे. हे नुकसान शेतकरी उघड्या डोळ्याने पाहत असताना राज्यात निवडून आलेले नेते खुर्चीसाठी मांजरबोक्‍याचा खेळ खेळत आहेत.

भंडारा : दिवाळीच्या सुमारास भंडारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात कोणीही जबाबदार अधिकारी नाही. अशावेळी मुख्यमंत्री चौकशीचे आदेश दिलेत असे सांगतात. या शासनाची चौकशी सुरू होईपर्यंत शेतकऱ्यांनी शेतात भिजलेले धान तसेच ठेवायचे काय? शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत सरकारला काहीच वाटत नाही का? असा प्रश्‍न आमदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केला.

शनिवारी जिल्ह्यात पाऊस झाला. यावेळी शेतकऱ्यांनी हलके धान कापणी केली असून कळपा शेतात ठेवल्या होत्या. पावसाने भिजलेल्या पिकाला कोंब आले आहेत. यापासून तांदूळ तयार करता येणे अशक्‍य झाले आहे. हे नुकसान शेतकरी उघड्या डोळ्याने पाहत असताना राज्यात निवडून आलेले नेते खुर्चीसाठी मांजरबोक्‍याचा खेळ खेळत आहेत. सरकारने नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना सरसकट एकरी 15 हजार रुपये मदत द्यावी, शेतकऱ्यांना विम्याची भरपाई द्यावी, कर्ज माफ करावे आणि विमा योजनेतील जाचक अटी रद्द कराव्या, अशी मागणी आमदार पटोले यांनी केली आहे. 

भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी कोणीही नाहीत. ते दिवाळी साजरी करण्यासाठी कुटुंबाकडे गेले आहेत. ही प्रशासकीय व्यवस्था सुधारण्यासाठी मुख्यमंत्री व मुख्य सचिवांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

धानविक्रीसाठी हवे जातीचे प्रमाणपत्र 
जिल्ह्यात धानखरेदी केंद्रात हमीभावावर धान खरेदी केली जाते. यावर्षी राज्य सरकारने शासन निर्णयात धानविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना जातीचे प्रमाणपत्र मागविले आहे. त्यामुळे धानविक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे जातीचे प्रमाणपत्रही जोडावे लागणार आहे. अशाप्रकारे राज्य सरकारचे धोरण असल्याने शेतकऱ्यांना त्याचा त्रास होत आहे, असे पटोले म्हणाले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nana patole critised state government