नाना भाऊ, आता जरा दमानं घ्या... 

मोहित खेडीकर 
रविवार, 1 डिसेंबर 2019

आपल्याच सरकारच्या विरोधात विधान भवन परिसरात घोषणाबाजी सुरू केली. परिसरात अचानक बैलगाडी आल्याचे पाहून पत्रकारांसह सारेच अवाक झाले होते. नाना पटोले एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी बैलगाडीतून आणलेले धानाचे पुंजणे विधान भवनाच्या पायऱ्यांवर जाळून टाकले.

नागपूर : 2011 सालची गोष्ट आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होते. आघाडी सरकार सत्तेवर होते. नाना पटोले साकोली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. या काळात धान उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा तापला होता. त्यामुळे पूर्व विदर्भाचे प्रतिनिधी म्हणून भूमिपुत्र नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले होते. ऐन अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या लावून धरण्यासाठी नानाभाऊंनी थेट बैलगाडीतून नागपूरचे विधान भवन गाठले.

विधान भवन परिसरात अचानक बैलगाडी
एवढेच नाही तर आपल्याच सरकारच्या विरोधात विधान भवन परिसरात घोषणाबाजी सुरू केली. परिसरात अचानक बैलगाडी आल्याचे पाहून पत्रकारांसह सारेच अवाक झाले होते. नाना पटोले एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी बैलगाडीतून आणलेले धानाचे पुंजणे विधान भवनाच्या पायऱ्यांवर जाळून टाकले. या कृत्याने अपेक्षेप्रमाणे त्यांच्यावर कारवाईची कुऱ्हाड कोसळली. विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी त्यांना संपूर्ण अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले. 

नाना पटोले यांच्याकडे जबाबदारी
नाना पटोले यांची रविवारी (ता. 1) विधानभेच्या अध्यक्षपदी अविरोध निवड झाली. त्याच्या अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी आली आहे. विधानसभेचे संसदीय कामकाज उत्तम रितीने चालावे, यासाठी त्यांना त्यांचे कसब दाखवावे लागेल. विशेषत: सरकारमध्ये तीन पक्ष आणि विरोधात एक पक्ष असताना येत्या काळात विधानसभेचे कामकाज चालवताना त्यांचा नक्कीच कस लागेल. सभागृहात महत्त्वाच्या विषयावर अनेकदा गदारोळ होतो. चक्‍क राजदंड पळविण्यापर्यंतच्या घटना घडतात. अशावेळी कायद्याच्या कक्षेत राहून अपेक्षित कार्यवाही करण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षावर असते. ती जबाबदारी आजपासून नाना पटोले यांच्याकडे आली आहे. 

आक्रमक नेते
विधासभेचे कामकाज सांभाळताना अध्यक्षाकडे दोन प्रकारचे कौशल्य असणे आवश्‍यक आहे. एकतर संसदीय कामकाजाचा अनुभव व सर्वात महत्त्वाचा कौशल्य म्हणजे संयम. मात्र नाना पटोले यांचे व्यक्तिमत्त्व पाहता, आक्रमक नेते म्हणूनच ते सर्वांना परिचित आहेत. ज्या-ज्या वेळी शेतकऱ्यांवर, कामगारांवर अन्याय झाला, त्या-त्या वेळी पटोले यांनी आपली आक्रमकता राज्यकर्त्यांना दाखवली आहे.

खासदारकीचा राजीनामा
एवढेच नाही तर भारतीय जनता पक्षाचे भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार असताना त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यासाठी विचार केला नाही. शेतकऱ्यांच्या समस्यांच्या बाबतीत केंद्र सरकार गंभीर नसल्याचा आरोप करून त्यांनी डिसेंबर 2017 मध्ये खासदारकीचा राजीनामा दिला होता. 

संयम सुटला होता
नंतरच्या काळात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेस पक्षाकडून थेट भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर मतदारसंघातून आव्हान दिले. यावेळी प्रचारादरम्यान सुद्धा त्यांच्या आक्रमकतेचा अनुभव नागपूरकरांना आला. लोकसभा निवडणुकीला अगदी थोडे दिवस शिल्लक असताना एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पटोले यांचा संयम सुटला होता. त्यावेळी त्यांनी भाजपच्या एका नेत्याशी एकेरी भाषेत वाद घातला होता. व्यासपीठावरून देखील ते अनेकदा ज्येष्ठ नेत्यांबाबत एकेरी भाषेत बोलले आहेत. 

हेही वाचा - जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभा अध्यक्ष; वाचा नाना पटोलेंचा प्रवास

शिघ्रकोपी स्वभाव
मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर आपल्याच पक्षाच्या एका नेत्यासोबत पटोले यांची चांगलीच बाचाबाची झाली होती. नेतृत्वाच्या वादातून ही घटना घडली होती. याची भंडारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आजही चर्चा होत असते. असे एक ना अनेक किस्से त्यांच्या शिघ्रकोपी स्वभावाचे सांगता येतील. 

"आली अंगावर, घेतली शिंगावर'
"आली अंगावर, घेतली शिंगावर' असा नाना पटोले यांचा एकंदर स्वभाव आहे. त्यामुळे सभागृहाच्या कामकाजाचा गाड हाकताना त्यांना स्वभावाशी नक्कीच तडजोड करावी लागणार आहे. म्हणून नानाभाऊ आजवर नेता म्हणून आक्रमकता कामी आली पण विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाज सांभाळताना अधिकाधिक संयम बाळगणेच बरे राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nana patole known as aggressive leader