फसणवीस सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी मनपात काँग्रेसची सत्ता हवी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

खासदार अशोक चव्हाण;  प्रगती महिला मंडळाची शहर पदाधिकारी निवडणूक संपन्न
 

नांदेड : पावसाचे अंदाज सांगणाऱ्या हवामान खात्यासारख्या कर्जमाफीच्या घोषणा करणाऱ्या फडणवीस सरकारला राज्यातील जनता आता फसणवीस सरकार म्हणत आहे. या फसणवीस सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी महापालिकेत काँग्रेसची सत्ता आणा असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केली.

प्रगती महिला मंडळाच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे शनिवारी (ता.१५) रोजी करण्यात आले होते. या वेळी ते मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या वेळी पक्षाचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा झारखंड अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष शकील अख्तर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे ते म्हणाले की, डॉ. शंकरराव चव्हाण यांनी मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या सिंचनाचा प्रश्न सोडविला आहे. त्यांच्यावर भक्ती असलेल्या नांदेड जिल्ह्यातील सामान्य जनतेंनी काँग्रेस पक्षाकडे महानगरपालिका, जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समित्या, नगरपालिका, पंचायत समित्या बहुसंख्येने सोपविल्या आहेत.

आगामी महानगरपालिका काँग्रेस पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला एकहाती सत्ता मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, विरोधी पक्षांकडे विशेषतः भाजपाकडे जिल्ह्यात नेतृत्त्व नसल्यामुळे त्यांना बाहेरून नेत्यांना आयात करावी लागते. कर्जमाफी असो किंवा अन्य घोषणा असो यामुळे जनतेचा भ्रमनिराश झाला आहे. लोकांना स्वप्न दाखवून सत्ते राहता येते हा सत्ताधाऱ्यांचा अतिआत्मविश्वास जनता निश्चित फोल ठरवेल.
यावेळी शकील अख्तर म्हणाले की, खासदार अशोक चव्हाण यांचे काम अत्यंत उत्तम असून मागील काही दिवसांपासून मी महाराष्ट्रामध्ये आहे. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकार्‍यांच्या भेटी घेत आहेत. इतर राज्यात अनेक ठिकाणी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याविषयी तक्रारी असतात. परंतु महाराष्ट्रात मात्र संपूर्ण काँग्रेसजन श्री. चव्हाण यांच्यासोबत असल्याचे चित्र मला दिसले.

या निवडणूक विषयक महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डी.पी. सावंत, आमदार वसंतराव चव्हाण, जि. प. अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, महापौर शैलजा स्वामी, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बी.आर. कदम, माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, रोहिदास चव्हाण, रावसाहेब अंतापुरकर, उपमहापौर शफी अहेमद कुरेशी, भाऊराव चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Web Title: nanded news ashok chavan vows to teach devendra fadnavis lesson