नाशिक, परळीचे प्रदूषण नागपूरच्या माथी!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 August 2019

नागपूर : कोराडी वीज प्रकल्पात नव्या दोन संचांच्या उभारणीचा प्रस्ताव येताच नागपूरकरांकडून विरोध सुरू झाला. विरोध थोपविण्यासाठी जुन्या संचांच्या बदल्यातच नवे संच उभे राहतील, असा युक्तिवाद सरकारकडून केला जात आहे. प्रत्यक्षात यापूर्वीच कोराडीतील संच क्रमांक 1 ते 4 ऐवजी संच क्रमांक 8 ते 10 ची उभारणी झाली आहे. तर, प्रस्तावित नवे संच नाशिक, परळी, चंद्रपूर येथील संचांच्या ऐवजी उभे राहणार असून तेथील प्रदूषणही नागपूरच्या माथी मारण्याचा घाट घालण्यात आला असल्याची तापदायक माहिती पुढे आली आहे.

नागपूर : कोराडी वीज प्रकल्पात नव्या दोन संचांच्या उभारणीचा प्रस्ताव येताच नागपूरकरांकडून विरोध सुरू झाला. विरोध थोपविण्यासाठी जुन्या संचांच्या बदल्यातच नवे संच उभे राहतील, असा युक्तिवाद सरकारकडून केला जात आहे. प्रत्यक्षात यापूर्वीच कोराडीतील संच क्रमांक 1 ते 4 ऐवजी संच क्रमांक 8 ते 10 ची उभारणी झाली आहे. तर, प्रस्तावित नवे संच नाशिक, परळी, चंद्रपूर येथील संचांच्या ऐवजी उभे राहणार असून तेथील प्रदूषणही नागपूरच्या माथी मारण्याचा घाट घालण्यात आला असल्याची तापदायक माहिती पुढे आली आहे.
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे 25 वर्षांपेक्षा जुने 210 मेगावॉटपर्यंत क्षमतेचे कालबाह्य संच मोडीत काढून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कमी प्रदूषण करणाऱ्या संचांची उभारणी करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार कोराडीतील प्रत्येकी 120 मेगावॉट क्षमतेच्या 1 ते 4 क्रमांकाच्या संचांऐवजी संच क्रमांक 8, 9 व 10 क्रमांकाच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित संचांची उभारणी करण्यात आली. आता पुन्हा प्रत्येकी 660 मेगावॉट क्षमतेचे दोन नवे संच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 8 हजार 407 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. आधीच प्रदूषणाने त्रस्त असणार्ऱ्या कोराडी आणि नागपूरच्या रहिवाशांना नव्या संचांना विरोध केला आहे. प्रारंभी विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि त्यानंतर विदर्भ कनेक्‍टसह अन्य संघटनांच्या शिष्टमंडळांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन नव्या प्रकल्पांना विरोध दर्शविला होता. त्यांनीही कोणताही नवा संच उभा राहणार नाही, जुन्या संचाऐवजी नवे संच उभारण्यात येणार असल्याची ग्वाही दिली होती.
दावे, प्रतिदाव्यांमधील विसंगतीचा मागोवा घेतला असता आश्‍चर्यकारक बाबी पुढे आल्या. नवीन संच जुन्याच प्रकल्पांच्या ऐवजी तयार होत आहेत. पण, हे संच केवळ कोराडी किंवा विदर्भातील संचांसह परळी व नाशिक येथील संचांच्या बदल्यातही असल्याचे समोर आले आहे. या निर्णयानुसार परळी व नाशिकचे केंद्र कमी होणार असले तरी कोराडीतील प्रदूषणात भर पडणार आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत महानिर्मितीचे प्रकल्प मुख्य अभियंता राजेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
महानिर्मितीचा दावा
नवीन संच कोराडीतच का उभारावेत याचे ठोस कारणही महानिर्मितीकडे आहे. जुने संच बदलल्याने प्रदूषणात घट होईल. जमीन व राख बंधारा पूर्वीच उपलब्ध आहे. पाण्याची उपलब्धतता असल्याने अतिरिक्त पाणी आरक्षणाची गरज नाही. शून्य पाणी निचरा व पाण्याचे पुनर्वापर होईल. कोराडीजवळ गरेपालमा येथे स्वत:ची खाण आहे शिवाय वेकोलिच्या भानेगाव, सिंगोरी, इंदर, कामठी, गोंडेगाव कोळसा खाणी असल्याने कोळसा वहनावरील खर्च वाचून वीज स्वस्त होईल. कोळसा वहनासाठी नागपूर - नागभीड ब्रॉडगेज रेल्वेलाइन, राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध आहे. एफ.जी.डी. एस.सी.आर. तंत्रज्ञानामुळे प्रदूषण कमी होईल. सांडपाणी वापराने वैनगंगा नदीचे प्रदूषण थांबेल. पाइप कन्व्हेयरनेही कोळसा वाहतूक शक्‍य आहे. राखेच्या दुरुपयोगावर लक्ष केंद्रित करणे शक्‍य होईल. राखेवर आधारित उद्योगांची उभारणी करता येईल. सर्वांत महत्त्वाचे प्रकल्पग्रस्त, स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
औष्णिक वीज प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे कोराडी, खापरखेड्याच्या 50 किमी परिघात आपत्ती ओढवली आहे. कर्करुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. रुग्णालये कमी पडतील अशी स्थितीत आहे. नवीन वीज प्रकल्प आणणार नाही, असा शब्द ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता. तो शब्द त्यांनी पाळावा. प्रदूषण सहन करणार नाही. विदर्भ राज्य आंदोलन समिती या प्रकल्पाला कडाडून विरोध करील. जनतेलाही विरोधात उभे केले जाईल.
राम नेवले
मुख्य संयोजक, विदर्भ राज्य आंदोलन समिती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik, Parli pollution over Nagpur!