राष्ट्रवादीला कॉंग्रेसच्या होकाराची प्रतीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

नागपूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीस सोमवारपासून प्रारंभ केला असला तरी कॉंग्रेसच्या होकाराकडे त्यांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणूक दोन्ही कॉंग्रेसने एकत्रित लढाव्या असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या वतीने कॉंग्रेसला देण्यात आला आहे. 

नागपूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीस सोमवारपासून प्रारंभ केला असला तरी कॉंग्रेसच्या होकाराकडे त्यांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणूक दोन्ही कॉंग्रेसने एकत्रित लढाव्या असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या वतीने कॉंग्रेसला देण्यात आला आहे. 

मागील निवडणूक कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्रित लढली होती. 29 जागा राष्ट्रवादीला देण्यात आल्या होत्या. राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक निवडून आले. मतविभाजन टळल्याने कॉंग्रेसलाही फायदा झाला होता. मात्र, आघाडीचे जागा वाटप निश्‍चित झाल्यानंतरही काही जागांवर ऐनवेळी कॉंग्रेसने उमेदवार उभे केले होते. याचा फटका दोन्ही कॉंग्रेसला बसला होता. 

कॉंग्रेससोबत वाटाघाटी करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वतःचा नगरसेवक असतानाही काही जागा सोडल्या होत्या. यामुळे मोठा वाद उफाळला होता. राजेश माटे राष्ट्रवादीचे नगरसेवक होते. मात्र, त्यांची जागा लोकमंचसाठी सोडण्यात आली होती. शंकरनगर प्रभागात शेवटपर्यंत उमेदवारच देण्यात आला नाही. यामुळे भाजपच्या विशाखा मैंद बिनविरोध निवडून आल्या. 

राष्ट्रवादीच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे यांच्या पत्नीसाठी आघाडीत जागा सोडण्यात आली होती. मात्र, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी येथून कॉंग्रेसच्या उमेदवार शेवंता तेलंग यांना एबी फॉर्म दिला. यामुळे दोन्ही कॉंग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. आता अशी "मैत्रीपूर्ण' आघाडी नको असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. 

धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी आम्ही कॉंग्रेसकडे प्रस्ताव दिला आहे. जागांची कुठलीही अट टाकण्यात आली नाही. त्यांचा होकार आल्यास उत्तम. नाही आला तरी आम्ही सर्व जागा लढण्यास सज्ज आहोत. सोबतच अनेक समविचारी पक्ष सोबतच येण्यास इच्छुक आहेत. त्यांच्याशीही बोलणी सुरू आहे. 
- अनिल देशमुख, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस. 

Web Title: Nationalist Congress Party's promise to wait