नागपुरातून नाटकांना प्रोत्साहन मिळेल

नितीन गडकरी
नितीन गडकरी

राम गणेश गडकरी नाट्यनगरी (नागपूर) : नागपुरात अनेक दर्जेदार नाटकं व्हायची. यात डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांच्या नाटकांचा समावेश होता. पण, मधल्या काळात ते बंद झाले. मात्र, आता नागपुरात नाटकांसाठी सुरेश भट सभागृह आहे. त्यामुळे नागपुरातून नाटकांना मोठे प्रोत्साहन मिळेल, असा विश्‍वास केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी सरकारने प्रत्येक जिल्ह्यात नाट्यगृहे बांधावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
अ. भा. मराठी नाट्य संमेलनाच्या उद्‌घाटन समारंभात ते स्वागताध्यक्ष म्हणून बोलत होते. मराठी नाटक महाराष्ट्राचा अभिमान असल्याचे नमूद करीत ते म्हणाले, मुंबईत असताना अनेक दर्जेदार नाटके बघण्याची संधी मिळाली. मात्र आता दिल्लीत गेल्यामुळे नाटक बघता येत नाही. नाटकातून मराठीचे वैभव वाढले. मराठी साहित्य, संस्कृती, नाट्य याचे महत्त्व महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहून कळत नाही. ज्यावेळी इतर राज्यात जातो, त्यावेळी मराठी नाटक, संस्कृती, सहित्य किती श्रेष्ठ आहे याची माहिती मिळते. आज मराठी नाटकांबाबत नेहमीच प्रत्येक जिल्ह्यात हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह बांधले पाहिजे, असे सरकारला नेहमीच सुचवित आलो आहे. त्यामुळेच नागपुरात सुरेश भट सभागृह बांधले. आयुक्तांनी एक लाख रुपये भाडे ठरविले होते. त्यांनी विजेचा खर्चच 80 हजार रुपये येईल, असे सांगितले. त्यामुळे भट सभागृहावर सौर ऊर्जा संयंत्र बसविले. नागपुरातील सांस्कृतिक कार्याला प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य आहे, याचा व्यावसायिक हिशेब करू नका, असे महापौर व आयुक्तांना सांगितले. अशाप्रकारच्या सुविधा मिळाल्या तर मराठी नाटकाला नक्कीच चांगले दिवस येतील. राज्य सरकारही याचा विचार करेल. येणाऱ्या काळात उत्तम कलाकृतीला जनतेचे अन्‌ सरकारचेही सहकार्य मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. जुन्या प्रत्येक नाटकातून एक संदेश दिला जात होता. समाजाच्या भविष्यनिर्मितीसाठी आवश्‍यक संदेश देणे आवश्‍यक आहे. यात कलावंत, लेखक, दिग्दर्शकाचे मोठे योगदान आहे, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com