"नवती'ने संत्रा उत्पादक सुखावला .

काटोल ः फुलत असलेल्या संत्राबागा.
काटोल ः फुलत असलेल्या संत्राबागा.

काटोल, (जि. नागपूर): जगप्रसिद्ध नागपुरी संत्र्याचे उत्पादन क्षेत्र निसर्गाच्या लहरीपणामुळे कमी होत असल्याने संत्रा बागायतदार पूर्णपणे खचला आहे. पावसाने मध्येच "गॅप' दिल्याने व आता परत पावसाच्या आगमनाने संत्राबागा फुलण्यास पूरक वातावरण निर्माण झाल्याने मृग बहराने बहुतेक बागा फुलू लागल्या आहेत. तालुक्‍यात मासोद, कामठी, जाटलापूर, पांजरा, कोंढाळी, खुंटाबा, वाई, येनवा, वंडली अशा अनेक व परिसरात बागा फुलल्या असल्याची माहिती बागायतदारांकडून मिळाली. त्यामुळे काही अंशी बागायतदार आशा धरून आहेत. यावर्षी दुष्काळ पडल्याने काटोल, नरखेड, कळमेश्वर तालुक्‍यांतील संत्राबागा पाण्याअभावी सुकल्या. यावर्षी तापमान सतत 48 अंशांवर बरेच दिवस राहिले. प्रतिकूल तापमानात बागा तग धरू शकल्या नाहीत. फेब्रुवारी, मार्चमध्ये फुलणारा आंबिया बहर फुलला. मात्र, उन्हाच्या तीव्रतेत टिकू शकला नाही. आंबिया बहराला मुबलक पाणी आवश्‍यक आहे. त्यामुळे आता आंबियाबार संत्रा मागणी अपुऱ्या पुरवठ्याअभावी महागणार आहे.
संत्रा बहुवार्षिक पीक योजनेत आल्याने बागायतदारांना दुष्काळामुळे हेक्‍टरी 18 हजारांची मदत जाहीर होईल, असे संकेत दिसू लागले आहेत. निसर्गाचे दृष्टचक्र, दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी होत असल्याने पाण्याची पातळी खोल जात आहे. जलसिंचन, पाणी उपसा यामुळे संत्रा बागायतदार नवीन संत्राबागा तयार करण्यास अनुकूल नाहीत. संत्राबागा तयार करण्यास व फळे घेण्यास किमान पाच वर्षे लागतात. दीर्घ प्रतीक्षेनंतर झाडे तयार करणे व त्यानंतर उत्पादन सुरू होईल, आदी सगळेच "रामभरोसे' प्रतीक्षा उचलायला बगायतदाराची मानसिक व आर्थिक स्थिती दिसत नाही.

संत्रा कलमाचा तुटवडा जाणवणार
जातवंत संत्रा कलम तयार करण्यास त्या प्रकारची तंदुरुस्त जातवाण संत्रा झाडे उपलब्ध असावी लागतात. त्यावरील डोळा घेऊन कलम बांधावी लागते. त्याचा पुरवठा नाही, पाणी समस्येमुळे बऱ्याच कलमउत्पादकांनी संत्रा कलमा तयार न केल्याने कलमांचा तुटवडा जाणार आहे. त्यामुळे यावर्षी कलमासुद्धा तेजीत राहणार आहेत. अशा परिस्थिती पूर्वीच वाळलेल्या संत्राबागा, लागवडक्षेत्र घटत असल्याने नागपुरी संत्रा उत्पादन क्षेत्र बेतात चालले आहे. त्यामुळे संत्र्याचा "कॅलिफोर्निया' आता संकटात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com