Election Results : अमरावतीत नवनीत राणांनी मारले मैदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

अमरावती : तब्बल 23 वर्षांनंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात महिलेस प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष (युवा स्वाभिमान) उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या किल्ल्यास खिंडार पाडत विजय संपादित केला. त्यांनी 37 हजार 295 मतांची आघाडी घेत विजय सुनिश्‍चित केला. पोस्टल मतांची मोजणी उशिरा पर्यंत सुरू होती. गतवेळच्या निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढत त्यांनी सेनेचे वर्चस्व संपुष्टात आणण्याच्या स्वप्नपूर्ती केली. यासोबतच अडसुळांची डबल हॅट्ट्रिकची संधी हुकली.

शिवसेना-भाजप युतीच्या आनंदराव अडसूळ यांना 18 व्या फेरीअखेर 4,70,549 तर अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांना 5,07,844 मते मिळाली, वंचित बहुजन आघाडीच्या गुणवंत देवपारे यांना 64,585 तर बसपच्या अरुण वानखडे यांना केवळ 12,232 मते मिळाली.
अमरावती लोकसभा या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून एकूण 24 उमेदवार रिंगणात होते. वंचित बहुजन आघाडी व बसपचा उमेदवार रिंगणात आल्याने मतविभाजनाची अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. या दोन्ही उमेदवारांना मतदारांनी सपशेल नाकारून थेट लढतीचे चित्र निर्माण केले. इतर अपक्षांनाही मतदारांनी नाकारले. नवनीत राणा व आनंदराव अडसूळ यांच्यात झालेल्या थेट लढतीत पहिल्या पाच फेरीपर्यंत अडसूळ यांनी आघाडी घेतली होती, मात्र सहाव्या फेरीनंतर चित्र पालटले.
सकाळी आठला मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीत आनंदराव अडसूळ यांना 4,348 मतांची आघाडी मिळाली ती त्यांनी पाचव्या फेरीपर्यंत वाढवत 9,330 पर्यंत नेली. त्यानंतर मात्र त्यांच्या आघाडीस उतरती कळा लागली. ती अखेरच्या फेरीपर्यंत सावरली नाही, नवनीत राणा यांच्या मतांचा टक्का मात्र सातत्याने वाढताच राहिला.
23 वर्षांपूर्वी 1991 मध्ये प्रतिभाताई पाटील कॉंग्रेसच्या उमेदवार म्हणून विजयी झाल्या होत्या. त्यानंतर 1996 मध्ये सेनेने कॉंग्रेसला मात देत हा मतदारसंघ आपल्या खात्यात जमा केला. 1998 चा अपवाद वगळता 2004 पासून हा मतदारसंघ शिवसेनेच्याच ताब्यात राहिला. त्याला या वेळी प्रथमच धक्का बसला. शिवसेनेचा गढ मानल्या गेलेल्या मतदारसंघात पाडाव झाला.
22 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
रिंगणातील 24 पैकी वंचित बहुजन आघाडीच्या गुणवंत देवपारे व बसपच्या अरुण वानखडे यांच्यासह 22 उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे. ती वाचविण्यासाठी एकूण मतांच्या 16 टक्के मतांची आवश्‍यकता होती. 1 लाख 76 हजार 789 मते मिळवणाऱ्या उमेदवारांची अनामत वाचणार होती, मात्र मतांचा हा टप्पा 22 पैकी एकही उमेदवार गाठू शकला नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navneeta rana won the battle of amravati