पोलिसांच्या कारवाईने नक्षल आर्थिक संकटात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

बिथरलेल्या माओवाद्यांनी पुन्हा धुडगूस सुरू केला असून कंत्राटदारासोबतच लोकप्रतिनिधींना आपले लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

गडचिरोली - गेल्या काही वर्षापासून गडचिरोली जिल्हात रस्ते व पुलाचे काम थंडबस्त्यात आहे त्यातच तेंदूपत्ता, बांबूची वाहतूक जिल्ह्याबाहेर होत नसल्याने नक्षलवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद कमी झाली आहे. यामुळे बिथरलेल्या माओवाद्यांनी पुन्हा धुडगूस सुरू केला असून कंत्राटदारासोबतच लोकप्रतिनिधींना आपले लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

नक्षलग्रस्त भागात जिल्हा पोलिस प्रशासनाने नक्षल विरोधी अभियान तेज केल्याने नक्षलवाद्यांनी आपला मोर्चा सिमावर्ती भागात वळविला आहे. छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याच्या सिमेलगतच्या जंगलाचा आधार घेऊन ते कारवाया घडवून आणत आहेत. विशेष म्हणजे पथ्रमच त्यांनी महिला नक्षलवाद्यांना समोर केले असून पोलिसांच्या आक्रमक भूमिकेपुढे माओवादी नेते हतबल झाले आहेत, तेंदू, बांबू, रस्ते व पूल बांधकामातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत होती. एवढच नाही तर या वाहतुकीतून शस्त्र, तसेच दारूगोळ्याच्या छुप्प्या पद्धतीने पुरवठा केला जात होता. यामुळे नक्षल संघटनांचे काम प्रभावी झाले होते. परंतु या सर्व साधनांकडे पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित केल्याने माओवाद्यांची मोठी अडचण झाली आहे.

Web Title: Naxal financial crisis due to police action