गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे हल्ले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात गुरुवारी नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात धुमाकूळ घालत मतदानात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. दोन ठिकाणी स्फोट घडवून आणले, तर एका केंद्रावर गोळीबार केला. यात तीन जवान जखमी झाले. दरम्यान, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक ६०.६३ टक्के मतदान झाले.

गडचिरोली - लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात गुरुवारी नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात धुमाकूळ घालत मतदानात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. दोन ठिकाणी स्फोट घडवून आणले, तर एका केंद्रावर गोळीबार केला. यात तीन जवान जखमी झाले. दरम्यान, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक ६०.६३ टक्के मतदान झाले.

नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्काराचे आवाहन केले होते. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात बंदोबस्त वाढविण्यात आला होता. नक्षलवाद्यांच्या धमकीला न भीता गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी दिवसभरात उत्स्फूर्तपणे मतदान केल्याचे चित्र दिसत होते. नक्षलवाद्यांनी दिवसभर कुरापती करून मतदानप्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

पुरसलगोंदी येथे सायंकाळी चारच्या दरम्यान भूसुरुंग स्फोट झाला. यात जखमी झालेले भीमराव दबा व हरी कुळयेटी या दोन जवानांना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरवर जांबिया जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. तत्पूर्वी नक्षलवाद्यांनी सकाळी ११ च्या सुमारास वाघेझरी येथील मतदान केंद्रावर आयईडीचा स्फोट घडवून आणला. दिवसभरात नक्षलवाद्यांनी दोन ठिकाणी हल्ले केले.

बावीस गावे मतदानापासून वंचित
एटापल्ली तालुक्‍यातील चार मतदान केंद्रांवर निवडणूक झालीच नाही आणि बावीस गावे मतदानापासून वंचित राहिली. यात गर्देवाडा, वांगेतुरी, पुसकोटी व वटेली मतदान केंद्रांवर नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे निवडणूक घेण्यास कोणतीही प्रशासकीय यंत्रणा पोचली नाही, त्यामुळे बावीस गावांतील मतदार मतदानापासून वंचित राहिले. या गावांची निवडणूक येत्या चार-पाच दिवसांत घेतली जाईल, अशी माहिती आहे. नक्षलवाद्यांच्या भीतीने कोरची तालुक्‍यातही सहा ठिकाणचे मतदान केंद्र हलविल्यामुळे नागरिकांना अन्य केंद्रांवर जावे लागले. एका ठिकाणी मतदानाची वेळ संपली म्हणून तेथे तैनात पोलिसांनी २०० मतदारांना केंद्रावरून हुसकवण्यात लावल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Web Title: Naxalite Attack on Gadchiroli District