नक्षलवाद्यांचे नेतृत्व आता गिरिधरकडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

गडचिरोली - महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील इंद्रावती नदीच्या किनाऱ्यावर पोलिस-नक्षलवाद्यांत झालेल्या चकमकीत चार विभागीय
सदस्य ठार केल्याने नक्षलवाद्यांचा दक्षिण विभाग नेतृत्वहीन झाला आहे. त्यामुळे आता जहाल नक्षलवादी गिरिधर ऊर्फ बिच्चू मानकू तुमरेटी याच्याकडे या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.

गडचिरोली - महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील इंद्रावती नदीच्या किनाऱ्यावर पोलिस-नक्षलवाद्यांत झालेल्या चकमकीत चार विभागीय
सदस्य ठार केल्याने नक्षलवाद्यांचा दक्षिण विभाग नेतृत्वहीन झाला आहे. त्यामुळे आता जहाल नक्षलवादी गिरिधर ऊर्फ बिच्चू मानकू तुमरेटी याच्याकडे या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.

चकमकीत ठार झालेल्या पेरमिली दलम कमांडर साईनाथ, अहेरी दलम कमांडर वासुदेव, विभागीय सदस्य सिन्नू व गट्टा दलम कमांडर राजू या चार जहाल माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडवून दहशत निर्माण केली होती. यामुळे गडचिरोली पोलिस दलाच्या त्यांच्या मागावर होतेच. जिल्हा पोलिस दलाने या चार जहाल नक्षलवाद्यांच्या दलमवर विशेष लक्ष केंद्रित करून "सी-60' पथकाच्या जवानांची सातत्याने शोध मोहीम सुरू केली होती. दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या दक्षिण विभागातील पाचपैकी चार सदस्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आल्याने चळवळीला मोठा धक्का बसला आहे.

इंद्रावती नदीच्या परिसरात झालेल्या चकमकीत गिरिधर बचावल्याने गेले चार दिवस नक्षलवादीविरोधी अभियान पथकाकडून त्याच्या शोधार्थ जोरदार मोहीम राबविली जात आहे. त्याला कुणाशीही संपर्क साधता येऊ नये, यासाठी अहेरी, एटापल्ली व भामरागड या तालुक्‍यांतील मोबाईल सेवाही बंद ठेवण्यात आली होती. परंतु गिरिधर पोलिसांच्या तावडीतून निसटला असून, त्याने सध्या छत्तीसगडमध्ये आश्रय घेतल्याची माहिती आहे.

25 लाखांचे बक्षीस
नक्षलवाद्यांच्या दक्षिण विभागात आता गिरिधर हा एकमेव अनुभवी सदस्य राहिला असून तो एटापल्ली तालुक्‍यातील जव्हेली खुर्द या गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असून, पोलिस दलाने त्याच्यावर 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण माहिती, गावकऱ्यांशी जवळीक तसेच हिंसक घटना घडवून आणण्यात तरबेज असल्याने नक्षलवादी संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांनी गिरीधरवर दक्षिण विभागाच्या चळवळीची जबाबदारी सोपविल्याची माहिती आहे.

Web Title: naxalite leader giridhar