सुरजागड परिसरात नक्षल्यांची दहशत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

एटापल्ली तालुक्‍यातील सुरजागड इलाका पट्ट्यातील गट्टा व जांबिया परिसरात माओवाद्यांनी बॅनरमधून आठ नागरिकांची नावे लिहून नक्षल चळवळीविरुद्ध पोलिसांना मदत करणाऱ्यांना मृत्युदंड देण्यात येईल, असा मजकूर लिहिला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिस खबऱ्यांना जिवे मारण्याची धमकी; जांबिया परिसरात बॅनर 
एटापल्ली (जि. गडचिरोली) - तालुक्‍यातील सुरजागड इलाका पट्ट्यातील गट्टा व जांबिया परिसरात माओवाद्यांनी बॅनरमधून आठ नागरिकांची नावे लिहून नक्षल चळवळीविरुद्ध पोलिसांना मदत करणाऱ्यांना मृत्युदंड देण्यात येईल, असा मजकूर लिहिला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेडरी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयांतर्गत गट्टा येथील शिशिर रामचंद्र मंडल यांची  गेल्या आठवड्यात नक्षल्यांनी धारदार शस्त्रे व बंदुकीची गोळी झाडून हत्या केली होती. टिटोळा  या गावातील एका लग्न समारंभात स्वमालकीचे जनरेटर भाड्याने घेऊन गेलेल्या शिशिरचे नक्षल्यांनी आदल्या रात्री अपहरण केले होते. यावेळी नक्षल्यांनी शिशिर यांना बेदम मारहाण करून आणखी काही पोलिस खबऱ्यांची नावे विचारली होती. त्यानंतर मृतदेहावर एक पत्रक टाकून त्यात आठ नागरिकांची नावे लिहून पोलिस खबरींना अशाचप्रकारे धडा शिकविला जाईल, असा मजकूर लिहिला होता. तसाच मजकूर लिहिलेली पत्रके गट्टा व जांभिया परिसरात आढळली.

माओवाद्यांकडून गेल्या काही दिवसांत पोलिस खबरीच्या नावाखाली नागरिकांच्या हत्या, विकास कामांवरील वाहनांची जाळपोळ व पोलिसांना लक्ष करून गोळीबार व बॉम्बस्फोट अशा घटना घडवून आणल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. नक्षलवाद्यांनी विविध ठिकाणी लावलेले बॅनर व पोस्टर गट्टा पोलिसांनी बुधवारी (ता. १५) ताब्यात घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naxalite Surjagad Area Dismay Crime