दंडकारण्यातील नक्षली धग विझतेय!

सुरेश नगराळे
मंगळवार, 18 जून 2019

नर्मदाक्काच्या नेतृत्वाखालील नक्षली कारवाया 

  • २००९ - हत्तीगोटा चकमकीत १६ जवान हुतात्मा
  • २०१० - लाहेरी येथील चकमकीत १७ जवान हुतात्मा
  • २०१६ - सुरजागड पहाडावर झालेली ८० वाहनांची जाळपोळ, जोगनगुडा येथील दोन शिक्षकांच्या हत्या
  • २०१९ - काही दिवसांपूर्वी भूसुरुंग स्फोटात १५ जवान हुतात्मा

गडचिरोली - नर्मदाक्‍का. मूळ नाव उप्पुगुंटी निर्मलाकुमार. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळीची सूत्रधार. तब्बल दोन दशके पोलिस तिच्यापर्यंत पोचू शकत नव्हते. पण, अखेर वय आणि आजाराने ती खचली अन्‌ अलगद पोलिसांच्या तावडीत सापडली. तिच्या अटकेने धगधगते दंडकारण्य शांत व्हायला लागेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

नर्मदाक्का आंध्र प्रदेशातील कोडापावनुरू येथील रहिवासी. तिचे वडील कम्युनिस्ट चळवळीतील. नक्षल चळवळीचे जनक चारू मुजुमदार यांच्या विचाराने ते प्रेरित झाले होते. तेच संस्कार नर्मदाक्कावर झाले. तरुण वयात तिने नक्षल संघटनेत प्रवेश केला. १९८२ मध्ये नर्मदाक्काच्या नेतृत्वात या भागात नक्षल चळवळीला प्रारंभ झाला. न्याय, हक्क, जमिनीचा अधिकार मिळवून देण्याची हमी देत तिने आदिवासींमध्ये लोकप्रियता मिळविली. 

गेल्या २१ वर्षांत एकट्या नर्मदाक्काने ४० जवान व ९० नागरिकांची हत्या केली. भूसुरुंगाच्या सहा मोठ्या घटनांसह ६५ लहान-मोठ्या हिंसाचाराच्या घटनांची सूत्रधार नर्मदाक्काच होती, असे पोलिस म्हणतात. सध्या मार्गदर्शक म्हणूनच तिची दलममध्ये भूमिका होती. पोलिसांनी तिला पती राणी सत्यनारायण ऊर्फ किरण ऊर्फ किरणदादा याच्यासोबत अटक केल्याने नक्षल चळवळ नेतृत्वहीन झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naxalite Women Narmadakka Arrested Crime