नर्मदाक्काच्या अटकेने नक्षल चळवळीला धक्का

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

गडचिरोली : जिल्ह्यातील नक्षल चळवळीची प्रमुख, दंडकारण्य स्पेशल झोनल समितीची सदस्य व जहाल नक्षली नर्मदाक्का हिला तिचा पती किरणकुमार याच्यासह गडचिरोली पोलिसांनी अटक केल्याने नक्षल चळवळीला जबर धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

गडचिरोली : जिल्ह्यातील नक्षल चळवळीची प्रमुख, दंडकारण्य स्पेशल झोनल समितीची सदस्य व जहाल नक्षली नर्मदाक्का हिला तिचा पती किरणकुमार याच्यासह गडचिरोली पोलिसांनी अटक केल्याने नक्षल चळवळीला जबर धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, गडचिरोली पोलिस अनेक दिवसांपासून नर्मदाक्का व किरणकुमार यांचा शोध घेत होते. दोघेही तेलंगणा राज्यातून सिरोंचामार्गे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी तेलंगणा पोलिसांच्या सहकार्याने नर्मदाक्का व किरणकुमार यांना सोमवारी (ता.10) संध्याकाळी सिरोंचा बसस्थानकावरून अटक केली.
उप्पुगुंटी निर्मलकुमार ऊर्फ नर्मदाक्का ऊर्फ नर्मदादीदी (वय 58) ही आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गलावरम मंडळमधील कोडापावनुरू येथील रहिवासी आहे. तिचा पती राणी सत्यनारायणा ऊर्फ किरण ऊर्फ किरणदादा (वय 70) हा ईस्ट गोदावरी जिल्ह्यातील राजानगरम मंडळमधील नरेंद्रपुरम येथील रहिवासी आहे. दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य असलेली नर्मदाक्का डीकेएएमएसची प्रभारी होती. एके-47 शस्त्र वापरणाऱ्या नर्मदाक्काच्याच नेतृत्वात जिल्ह्यातील बहुतांश नक्षली आजवर काम करीत होते. येथे आजवर झालेल्या अनेक जाळपोळीत व हत्यांची मास्टर माइंड नर्मदाक्का हीच होती. 2009 मध्ये हत्तीगोटा चकमक, 2010 मधील लाहेरी येथील चकमक, 2016 मध्ये सुरजागड पहाडावर झालेली 80 वाहनांची जाळपोळ, जोगनगुडा येथील दोन शिक्षकांच्या हत्या अशा अनेक गुन्ह्यांत तिचा सहभाग होता. तिच्यावर जिल्ह्यात 65 गुन्हे दाखल होते. शासनाने त्या दोघांवर 50 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
नर्मदाक्का चळवळीत आल्यानंतर किरणकुमार याच्याशी तिचा विवाह झाला. किरणकुमार हादेखील दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य होता. तसेच दंडकारण्य पब्लिकेशन टीमचा प्रभारी होता. नक्षल्यांच्या "प्रभात' या मासिकाचाही तो संपादक होता. कुरखेडा तालुक्‍यातील जांभूळखेडा येथे 1 मे रोजी घडून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले होते. या घटनेतही नर्मदाक्काचा हात असल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

100 कोटींचा प्रस्ताव
गडचिरोली जिल्ह्यात रस्ते, पूल व अन्य विकासकामांसाठी पोलिस प्रशासनाने शासनाकडे 100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली असून याबाबतचा प्रस्तावसुद्धा पाठवला आहे. विकासकामांसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. पोलिस भरतीत 100 टक्के स्थानिक उमेदवार घेतले जाणार आहेत. काही दिवसात पोलिस शिपायाच्या 200 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार असून शासनाकडून मान्यतासुद्धा मिळाली आहे.

Web Title: Naxalites nardakka arrested affected Naxal movement