नक्षल्यांनी पेटवली १० जेसीबींसह १६ वाहने

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

एटापल्ली (जि. गडचिरोली) - तालुक्‍यातील हालेवार पोलिस स्टेशन हद्दीतील गट्टेपल्ली गाव जंगल परिसरात पंतप्रधान ग्राम सडक योजनेवरील १० जेसीबी मशीन, पाच जॉइंडर ट्रॅक्‍टर व एक पिकअप वाहन अशी १६ वाहने नक्षल्यांनी भरदिवसा पेटवली. त्यामुळे सहा ते सात कोटी रुपयांचे नुकसान झाले. 

एटापल्ली (जि. गडचिरोली) - तालुक्‍यातील हालेवार पोलिस स्टेशन हद्दीतील गट्टेपल्ली गाव जंगल परिसरात पंतप्रधान ग्राम सडक योजनेवरील १० जेसीबी मशीन, पाच जॉइंडर ट्रॅक्‍टर व एक पिकअप वाहन अशी १६ वाहने नक्षल्यांनी भरदिवसा पेटवली. त्यामुळे सहा ते सात कोटी रुपयांचे नुकसान झाले. 

पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत वटेगट्टा ते गट्टेपल्ली गावापर्यंत तीन किमी रस्ता निर्मितीचे काम गडचिरोलीच्या खुणे कंत्राटदारांकडून केले जात आहे. त्या कार्यावर मुरूम काम संपवून शुक्रवारी (ता. ३०) दुपारी ३ वाजता दरम्यान सर्व २० वाहने रेगाडीमार्गे गडचिरोलीला परत जात होती. चार वाहने पुढे निघून गेली व सोळा वाहने जात असताना जंगल परिसरातील वाटेत पाळत ठेवून असलेल्या ५० ते ६० च्या संख्येतील शस्त्रसज्ज व गणवेशधारी नक्षल्यांनी घेराव घालून थांबविली. सर्व वाहनचालक, वाहक व मजुरांना वाहनावरून सर्व साहित्यासह खाली उतरण्यास सांगून वाहनांना आग लावली. यावेळी मजूर, वाहक व चालकांना रस्ता निर्माण कार्य करण्यात येऊ नये, अशी धमकी देण्यात आली आहे. घटनेची माहिती सायंकाळी सात वाजता सर्व मजूर, वाहक व चालकांकडून हालेवारा पोलिसांना देण्यात आली. शनिवारी (ता. १) दुपारी १२ वाजेपर्यंत पोलिस घटनास्थळी पोहोचले नव्हते. ही जाळपोळ माओवाद्यांच्या कसनसूर एरिया कमिटीने केली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे.

सुरजागड परिसरातही पोस्टर
एटापल्ली तालुक्‍यातील आलदंडी पोलिस स्टेशनपासून हेडरी पोलिस स्टेशन हद्दीतील सुरजागड लोहखनिज पहाडीच्या सात किलोमीटर परिसरात अनेक गावांत पोस्टर व बॅनर लावून २ ते ९ डिसेंबर गोरिल्ला वॉर ग्रुपचा १८ स्थापनादिन सप्ताह उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भांडवलशाहीवादी व फॅसिस्टवादी सरकारचा धिक्कार करा, असेही आवाहन करणारा मजकूर लिहिला आहे. या पोस्टरवर एल. पी. जी. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) असा उल्लेख आहे.

Web Title: Naxals burned 16 vehicles with 10 JCBs