राष्ट्रवादीला अजूनही आघाडीची आशा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

नागपूर - नागपूर महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी तुटली, असे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले असले तरी राष्ट्रवादीला अद्याप आघाडीची आशा आहे. राष्ट्रवादीने पुण्यामध्ये आघाडी करायची असेल तरी नागपूरमध्येही ती करावी लागेल, अशी अट काँग्रेससमोर ठेवली असल्याचे कळते. 

नागपूर - नागपूर महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी तुटली, असे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले असले तरी राष्ट्रवादीला अद्याप आघाडीची आशा आहे. राष्ट्रवादीने पुण्यामध्ये आघाडी करायची असेल तरी नागपूरमध्येही ती करावी लागेल, अशी अट काँग्रेससमोर ठेवली असल्याचे कळते. 

मंगळवारी रात्री अनिल देशमुख यांनी आघाडी तुटल्याची घोषणा केली. आता यासंदर्भातील चर्चा बंद झाली असून राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. राष्ट्रवादीने नागपूरमध्ये २५ जागांची मागणी केली होती. ती काँग्रेसने धुडकावून लावली. राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेल्या जागाही सोडण्यास काँग्रेसने नकार दिला होता. माजी नगरसेवक राजेश माटे यांच्या प्रभागात काँग्रेसचा नगरसेवक आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये काँग्रेसचा नगरसेवक आहे. मात्र ही जागा राष्ट्रवादीला वेदप्रकाश आर्य यांच्यासाठी पाहिजे होती. 

राजू नागुलवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे यांनी आपल्या पत्नीसाठी जागेची मागणी केली होती. मात्र येथे काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. जागा वाटपाचा कुठलाच ताळमेळ बसत नसल्याने आघाडीची चर्चा फिसकटली. असे असले तरी पुण्यातील वाटाघाटींमुळे नागपूरमधील आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या आहे. पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. यामुळे त्यांचाच शब्द चालणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुण्यामध्ये जागा पाहिजे असतील, तर नागपूरमध्ये आघाडी करण्याची अट टाकल्याचे समजते. यामुळे काँग्रेसची अडचण होणार आहे.

सपासोबत समझोता?
आघाडी तुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने समाजवादी पक्षासोबत चर्चेची बोलणी सुरू केली आहे. बुधवारी एक छोटेखानी बैठक झाली. राष्ट्रवादीने मुस्लिम लीगसोबत आधीच युती केली आहे. आणखी काही छोट्यामोठ्या तसेच समविचारी पक्षासोबत बोलणी करून राष्ट्रवादी महाआघाडीत तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

काँग्रेससोबत आघाडीवर पडदा पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आज (बुधवार) आपली पहिली यादी जाहीर केली. माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्या पत्नीला गेल्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा ते स्वतःच प्रभाग एक (ड)मधून  रिंगणात असणार आहेत. 

याव्यतिरिक्त माजी नगरसेवक अशोक काटले यांची पत्नी जया काटले यांना प्रभाग ३२ (क)मधून उमेदवारी देण्यात आली आहे. कामील अन्सारी, दुणेश्‍वर पेठे आणि राजू नागुलवार या तिन्ही विद्यमान नगरसेवकांची नावे अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत आहेत.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल अहीरकर यांचा मुलगा स्वप्नील याला प्रभाग २० (क)मधून उमेदवारी देण्यात आली आहे. 

पहिल्या यादीतील उमेदवार 
प्रभाग १ (ड) - वेदप्रकाश आर्य, प्रभाग ७ (अ) - वर्षा श्‍यामकुळे, प्रभाग ७ (ड) - महेंद्र भांगे, प्रभाग ८ (ब) - कामील अन्सारी, प्रभाग २० (ब) - प्रिया राजेश आत्राम, प्रभाग २० (क) - स्वप्निल अनिल अहीरकर, प्रभाग २३ (क) - दुणेश्‍वर पेठे, प्रभाग ३१ (ड) - सुखदेव वंजारी, प्रभाग ३२ (अ) - विलास ठाकरे, प्रभाग ३२ (ब) - मीना प्रवीण कुंटे, प्रभाग ३२ (क) - जया अशोक काटले आणि प्रभाग ३२ (ड) - राजकुमार नागुलवार.

Web Title: ncp congress aghadi break in municipal election