खासदार पटेलांसह आंदोलनकर्त्यांना अटक व सुटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

भंडारा - शेतकरी, शेतमजुरांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’चा प्रयत्न केला. पोलिसांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक केली. नंतर या सर्वांना सोडून देण्यात आले.

भंडारा - शेतकरी, शेतमजुरांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’चा प्रयत्न केला. पोलिसांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक केली. नंतर या सर्वांना सोडून देण्यात आले.

शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावी आणि इतर अनेक मागण्यांसाठी आज, सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसद्वारे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. दुपारी १२ वाजतानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात आंदोलनकर्ते एकत्र आले. राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. भाजप नेत्यांनी निवडणुकीच्या आधी सातबारा कोरा करण्याचे आश्‍वासन शेतकऱ्यांना दिले होते. परंतु, केंद्र व राज्यात भाजप सत्तेवर येताच त्यांना दिलेल्या आश्‍वासनांचा विसर पडला. गेल्या तीन वर्षांत सरकारने कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नाही, असा आरोप खासदार पटेल यांनी केला. याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, सुनील फुंडे, रामलाल चौधरी, नरेश डहारे, शुभांगी रहांगडाले, अभिषेक कारेमोरे, कल्याणी भुरे, रूपेश  खवास, विजयकुमार डेकाटे, सुनंदा मुंडले, विठ्ठल कहालकर, अविनाश ब्राह्मणकर, शैलेश मयूर, नरेंद्र झंझाड, लोमेश वैद्य, वासुदेव बांते, देवदंच ठाकरे, विकास गभणे, नरेश चुन्ने, प्रभाग गुप्ता, हितेश सेलोकर, दादाजी खंडाईत, अरुण गोंडाणे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारावे, असा आग्रह धरला. त्यांनी त्याला नकार दिल्याने प्रफुल्ल पटेल यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय महामार्गावर ठाण मांडून रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. सुमारे २०० जणांचा जमाव महामार्गावर होता. यामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली. शेवटी पोलिसांनी खासदार पटेल यांच्यासह आंदोलनकर्त्यांना अटक केली. पोलिस मुख्यालयात सर्वांना नेऊन कारवाई करण्यात आली. सायंकाळी सर्वांना सोडून देण्यात आले. यात ३० पुरुष आणि सहा महिलांना अटक केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Web Title: NCP on the road for debt waiver