‘एनडीआरएफ’चे कॅम्पस १५३ एकरांत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

दिल्लीत आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येईल. एखाद्या आपत्तीत काम करीत असलेल्या जवानांना थेट या नियंत्रण कक्षातून गरजेनुसार मदत मागता येईल. ही मदत अधिक बळ, साधनांची असेल. जवानांना थेट महासंचालकांसोबत संवाद साधता येईल. 
- एस. एन. प्रधान, महासंचालक, ‘एनडीआरएफ’.

नागपूर - काही वर्षांमध्ये ‘एनडीआरएफ’ने (राष्ट्रीय आपत्ती कृती बल) भूकंप, त्सुनामी, वादळातून नागरिकांना वाचवले. अजूनही ‘एनडीआरएफ’मध्ये सुधारणेला वाव आहे. भविष्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान, आयटीचा वापर, स्वतःची संवाद प्रणाली निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे देशातीलच नव्हे तर जगभरातून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गिरविण्यासाठी तरुण ‘एनडीआरएफ’कडे येतील. त्यांच्यासाठी कोराडीजवळील सुरादेवी येथे १५३ एकरांत सर्वसोयीयुक्त कॅम्पस तयार करण्यात येणार आहे. 

एनडीआरएफ अकादमीचे कॅम्पसच्या जागेची पाहणी एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी आज केली. सायंकाळी सिव्हिल लाइन्स येथील एनडीआरएफ अकादमी कॅम्पसच्या उद्‌घाटनानंतर ते पत्रकार परिषदेत त्यांनी एनडीआरएफची भविष्यातील वाटचालही स्पष्ट केली. एनडीआरएफ जवानांना भूकंप, त्सुनामी, पूर, वादळासारख्या संकटात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी सतत ‘मॉकड्रिल’ची गरज आहे.

त्यामुळे एनडीआरएफ अकादमीमध्ये एखादे लहान खेडे वसवून पूरस्थिती निर्माण करणे, भूकंपासारखी स्थिती निर्माण करून मॉकड्रिलच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे प्रधान यांनी सांगितले. प्रत्येक मुलाला आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

राज्य पोलिस बल, अग्निशमन विभाग, एनडीआरएफ, एनएसजीसह संकटाच्या वेळी कामे करणाऱ्या संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. यात एनडीआरएफ समन्वयाची भूमिका बजावण्यास तयार आहे. सुरुवातीला अल्प साधनांच्या बळावर असलेले एनडीआरएफ पुढील सहा महिन्यांत अत्याधुनिक साधनांसह सज्ज होईल. ‘आयटी’चा वापर करण्यात आतापर्यंत एनडीआरएफ कमी पडले.

परंतु, पूर, भूकंप, वादळ आदींचा डाटा जमा करणे तसेच सातत्याने नैसर्गिक संकट येत असलेल्या भागाच्या ‘मॅपिंग’वर आता लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. संकटस्थितीत अनेकदा मोबाईल किंवा फोनही काम करीत नाही. त्यामुळे संवादाची स्वतःची प्रणाली विकसित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

नैसर्गिक संकटाची माहिती घेण्यासाठी ‘इस्त्रो’ तसेच हवामान खात्याची मदत होते. अनेकदा संकटात एनडीआरएफ जवान मदत कार्य करीत असतात. त्यांनाही सैन्याच्या धर्तीवर तयार अन्न मिळावे, यासाठी डीआरडीओसोबत करार केल्याचे ते म्हणाले. सध्या एनडीआरएफकडे १२ बटालियन असून, आणखी चारसाठी मंजुरी मिळाली. एनडीआरएफने देशात दोन लाखांवर स्वयंसेवक तयार केलेत. समाजात स्वयंसेवक प्रशिक्षित करण्यावर भर असून, त्यांच्याकडून संकटाच्या वेळी मदतीची अपेक्षा आहे. एनडीआरएफ प्रत्येकाला निःशुल्क प्राथमिक प्रशिक्षण देईल, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेत महानिरीक्षक रवी जोसेफ लोक्कू, नागपूर एनडीआरएफचे संचालक मनीष रंजन, उपमहानिरीक्षक (प्रशिक्षण) मनोजकुमार यादव, उपमहानिरीक्षक के. के. सिंग होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NDRF Campus