काटेकोर नियमात आज "नीट'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

53 केंद्रांवर 25 हजारांवर विद्यार्थी देणार परीक्षा

53 केंद्रांवर 25 हजारांवर विद्यार्थी देणार परीक्षा
नागपूर - एमबीबीएस आणि डेंटल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) रविवारी (ता. सात) "नॅशनल इलिजिबिलिटी कम इंटरन्स टेस्ट' (नीट) परीक्षा होत आहे. शहरातील 53 केंद्रांवर 25 हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देतील. यंदाही सीबीएसईतर्फे बरेच काटेकोर नियम लावण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा चांगलाच कस लागणार आहे. विशेष म्हणजे बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचण्याची कसरत करावी लागणार आहे.

गतवर्षी "नीट' परीक्षेदरम्यान बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहचण्यासाठी थोडा उशिरा झाल्यावर केंद्रात प्रवेश देण्यास नाकारण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी बहुतांश विद्यार्थ्यांनी आदल्या दिवशीच नागपूर गाठून केंद्राची शहानिशा केल्याचे समजते.

विशेष म्हणजे काही स्वयंसेवी संस्थांकडूनही विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. परीक्षेसंबंधीच्या संपूर्ण माहितीसह परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी काय करावे, याबाबत नीट परीक्षेच्या संकेतस्थळावर नियमांची यादी देण्यात आली आहे. त्यात मुलांसाठी कुर्ता पायजामा, जोडे नकोत, फिकट रंगाची जीन्स किंवा ट्राउजर आणि हाफ शर्ट घालावे, मुलींनी मोठे बटन, ब्रोच, हाय हिल घालून येऊ नये, पेन, पेन्सिल, खोडरबर, कॅल्क्‍युलेटर, कंपास बॉक्‍स, पाउच, लॉग टेबल वापरण्यासही मनाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे परीक्षा केंद्रावर सर्वप्रकारचे आवश्‍यक साहित्य विद्यार्थ्यांना दिले जाईल. या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर होणार आहे.

विद्यार्थ्यांना मदत करा
"नीट' परीक्षा रविवारी असल्याने शहरात बऱ्याच परीक्षा केंद्रावर गर्दी होणार आहे. दरम्यान भारतीय विद्या भवन आणि सेंटर पॉइन्ट यांच्या शाखांवरही केंद्र देण्यात आल्याने या शाळांसदर्भात विद्यार्थ्यांमध्ये बरीच संभ्रमावस्था निर्माण होण्याची शक्‍यता आहे. शिवाय वर्धा मार्गावरील नारायण स्कूलही शहराबाहेर असल्याने त्याठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बराच वेळ लागेल. अशावेळी विद्यार्थ्यांना नागरिकांनी मदत करण्याचे आवाहन शिक्षक आणि विद्यार्थी संघटनांनी केले आहे.

एनएसयूआय लावणार केंद्र
बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना नेमके केंद्र आणि त्या केंद्रावर जाण्यासाठी नेमका रस्ता कोणता, हे सांगण्यासाठी बसस्थानक आणि रेल्वेच्या दोन्ही गेटवर एनएसयूआयतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे केंद्र उभारण्यात येणार आहे.

Web Title: neet exam