‘नीट’ परीक्षेला ‘नीट ड्रेसकोड’वर या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

नागपूर - वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस आणि डेंटल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे रविवारी (ता. ६) सकाळी दहा वाजता ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम इंटरन्स टेस्ट’ (नीट) घेण्यात येणार आहे. सीबीएसईने काटेकोर नियमांची यादीच प्रकाशित केली असून, विद्यार्थ्यांना जोड्यांपासून, तर हेअरपीनपर्यंत सर्वच वस्तू आत नेण्यास मज्जाव केला आहे. परीक्षेसाठी विशिष्ट ‘ड्रेसकोड’ दिल्याने केंद्रावर विद्यार्थ्यांची तारांबळ उडणार आहे. नागपूर विभागातून शहरातील २७ सीबीएसई शाळांच्या केंद्रावर जवळपास वीस हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देतील.

दोन वर्षांपूर्वी परीक्षेत बराच घोळ झाला होता. मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांना पाच मिनिटे उशीर झाल्यावर आत घेण्यास मज्जाव केला होता. या प्रकाराने बऱ्याच ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या वर्षी तसा गोंधळ होऊ नये यासाठी अगोदरच सीबीएसईने राज्यात तीन विभागांचा समावेश केला आहे. त्यात अमरावती, नांदेड आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील एका विभागाचा समावेश आहे.

परीक्षेसंबंधीच्या माहितीसह परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी काय करावे, याबाबत ‘नीट’च्या संकेतस्थळावर नियमांची यादीच दिली आहे. त्यात मुलांसाठी फिकट रंगाची जीन्स किंवा ट्राउजर आणि हाफ शर्ट घालण्यास सांगितले आहे. तसेच मुलींनी ब्रोच, हाय हिल घालून येऊ न येणे, पेन, पेन्सिल, खोडरबर, कॅल्क्‍युलेटर, कंपास बॉक्‍स, पाऊच, लॉग टेबल वापरण्यासही मनाई केली आहे. विशेष म्हणजे, परीक्षा केंद्रावर सर्व प्रकारचे आवश्‍यक साहित्य विद्यार्थ्यांना दिले जाईल. परीक्षेचा निकाल ५ जून रोजी जाहीर होणार आहे. नागपूरसह विदर्भात अमरावती येथेदेखील या परीक्षेचे केंद्र दिले आहे.

केंद्रावर हे घेऊन जा
प्रवेशपत्र, पासपोर्ट फोटोसह अटेंडंट शीट, अपलोड केलेल्या प्रवेश अर्जासह प्रवेशपत्रावर फोटो.

विद्यार्थ्यांनो, हे करा
-घड्याळ, मंगळसूत्र, कानातले, बांगड्या बांधून येऊ नका.
-मोबाईल, इयरफोन, ब्ल्यूटूथ, मायक्राफोन चालणार नाहीत.
-वॅलेट, गॉगल्स, हॅंडबॅग, पट्टा, टोपी, ब्रेसलेट, कोणतेही दागिने यांना बंदी.
-मुलांसाठी कुर्ता पायजामा, जोडे नकोतच.
-धातूच्या वस्तू, खाण्याचे पदार्थ, पाणी बॉटल नेता येणार नाही.
-केवळ स्लीपर किंवा सॅंडल घालावेत.

अशा असेल पेपर
मल्टीपल चॉइस असलेल्या १८० प्रश्‍नांचा पेपरमध्ये फिजिक्‍स, केमेस्ट्री आणि बायोलॉजीचा समावेश केला आहे. यात फिजिक्‍स आणि केमेस्ट्रीसाठी प्रत्येकी ४५ प्रश्‍न, तर बायोलॉजीसाठी ९० प्रश्‍न विचारण्यात येईल. त्यासाठी ७२० गुण देण्यात येईल. म्हणजेच प्रत्येक प्रश्‍नासाठी चार गुण देण्यात येईल. निगेटिव्ह मार्किंग असल्याने प्रश्‍न चुकल्यास त्यातून एक गुण कमी करण्यात येईल. पेपर सोडविण्यासाठी तीन तासांचा अवधी देण्यात आलेला आहे.

असे आहे टायमिंग
- परीक्षा केंद्रात प्रवेश - स्लॉट ए - ७.३०, स्लॉट बी - ८.३०.
- परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची अंतिम वेळ ९.३०.
- टेस्टच्या बुकलेटचे वितरण - ९.४५.
- बुकलेटचे सील काढणे - ९.५५.
- परीक्षेची सुरुवात - १०.००.
- परीक्षेची समाप्ती - १.०० (दुपारी)

Web Title: neet exam dresscode