‘नीट’ परीक्षेला नीटनेटक्‍या कपड्यात या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

मुलांना जीन्स व हाफ शर्ट तर मुलींना सलवार कुर्ताच चालेल

मुलांना जीन्स व हाफ शर्ट तर मुलींना सलवार कुर्ताच चालेल

नागपूर - वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस आणि डेंटल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे रविवारी (ता.७) सकाळी दहा वाजता ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम इंटरन्स टेस्ट’ (नीट) घेण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान सीबीएसईने काटेकोर नियमांची यादीच प्रकाशित केली असून, त्यात विद्यार्थ्यांना जोड्यांपासून तर हेअर पीनपर्यंत सर्वच वस्तू  आत नेण्यास मज्जाव आहे. विशिष्ट ‘ड्रेसकोड’ ठरवून दिला आहे. देशभरातील ११ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. नागपूर विभागातून शहरातील ५३ सीबीएसई शाळांच्या केंद्रावर सुमारे २५ हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देतील. 

गतवर्षी परीक्षेदरम्यान बराच घोळ झाला होता. मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांना पाच मिनिटे उशीर झाल्यावर आत घेण्यास मज्जाव केला होता. दरम्यान, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यंदा तसा गोंधळ होऊ नये म्हणून अगोदरच सीबीएसईने राज्यात तीन विभागांचा समावेश केला आहे. त्यात अमरावती, नांदेड आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील एका विभागाचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना सूचना दिलेल्या आहेत. परीक्षेसंबंधीच्या संपूर्ण माहितीसह परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी काय करावे, याबाबत नीट परीक्षेच्या संकेतस्थळावर नियमांची यादीच दिली आहे. त्यात मुलांसाठी कुर्ता पायजामा, जोडे नकोत. फिक्‍कट रंगाची जीन्स किंवा ट्राउजर आणि हाफ शर्ट मुलींनी मोठे बटण, ब्रोच, हाय हिल घालून येऊ नये, पेन, पेन्सिल, खोडरबर, कॅल्क्‍युलेटर, कंपास बॉक्‍स, पाऊच, लॉग टेबल वापरण्यासही मनाई केली आहे. विशेष म्हणजे परीक्षा केंद्रावर सर्व प्रकारचे आवश्‍यक साहित्य विद्यार्थ्यांना दिले जाईल. निकाल ८ जून रोजी जाहीर होणार आहे. नागपूरसह विदर्भात अमरावतीत परीक्षेचे केंद्र दिले आहे.  
 

राज्यात मराठीतून देता येईल परीक्षा  
वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नॅशनल इलिजिबिलीट कम इंट्रन्स टेस्ट’ (नीट) आता मराठीसह आठ प्रमुख भाषांमध्ये घेण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला. यासंदर्भात विविध राज्य सरकारसोबत मंत्रालयाने चर्चा केली. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने इतर राज्यांशी चर्चा करून विविध प्रादेशिक भाषांमध्ये या परीक्षा घेण्यावर सहमती मिळविली. आता त्यानुसार इंग्रजीसोबतच मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, आसामी, तेलुगू, तमिळ आदींचा समावेश आहे. यावर्षीच्या ‘नीट’ परीक्षेपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, यासंदर्भात विचारणा केली असता, राज्यनिहाय भाषा देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून  सांगण्यात आले. मात्र, त्याबद्दल उद्याच्या पेपरमध्येच कळणार असल्याचे ते म्हणाले. 

नियमावली
घड्याळ, मंगळसूत्र, कानातले, बांगड्या घालून येऊ नका 
मोबाईल, इयरफोन, ब्ल्यूटूथ, हेल्थ बॅण्ड, मायक्रोफोन चालणार नाहीत
वॅलेट, गॉगल्स, हॅण्डबॅग, पट्टा, टोपी, ब्रेसलेट, दागिन्यांना बंदी 
मुलांसाठी कुर्ता पायजामा, जोडे नको. फिक्‍कट रंगाची जीन्स किंवा ट्राउजर आणि हाफ शर्ट
मुलींनी मोठे बटण, ब्रोच, हाय हिल घालून येऊ नये 
धातूच्या वस्तू, खाण्याचे पदार्थ, पाणी बॉटल नेता येणार नाही
केवळ स्लीपर किंवा सॅंडल घालावी
सकाळी साडेनऊनंतर परीक्षा केंद्रावर प्रवेश नाही

गुरुदेव सेवा मंडळाद्वारे निवास व्यवस्था
परीक्षेसाठी बाहेरगावाहून आदल्या दिवशी येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पाल्यासह केंद्राच्या परिसरात किंवा आजूबाजूला राहण्याची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे यंदा प्रथमच गुरुदेव सेवा मंडळातर्फे असे विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी सुभाष मार्गावरील आश्रमात नि:शुल्क  राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी पालकांनी (९८२२२६५२६८) अशोक यावले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: neet exam formal uniform