नीता चाफलेचा पॉवरलिफ्टिंगमध्ये "पॉवर'

नीता चाफले
नीता चाफले

नागपूर : तिचे पहिले प्रेम क्रिकेट होते. उमेदीच्या काळात विदर्भाकडून खेळताना देशभरातील क्रिकेटची मैदाने गाजविली. मात्र, मैदान सुटल्याने लठ्ठपणा वाढू लागला. त्यामुळे 48 व्या वर्षी पॉवरलिफ्टिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि अवघ्या आठ-दहा दिवसांत जिल्हापाठोपाठ राज्य स्पर्धेतही "गोल्ड' जिंकून तिने आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले. शिवाय युवा खेळाडूंसमोर नवा आदर्शही ठेवला. ही हरहुन्नरी खेळाडू आहे नागपूरची नीता चाफले (भोयर). ती सध्या मुंबईत स्थायिक असली तरी तिचा नागपूरचा ऋणानुबंध कायम आहे. यष्टिरक्षक व आक्रमक फलंदाज राहिलेल्या नीताने बीसीसीआयच्या अनेक स्पर्धांमध्ये विदर्भाचे प्रतिनिधित्व केले. दिल्ली येथे कुरुक्षेत्र संघाविरुद्ध 92 धावांची तुफान खेळी करून तिने आपल्यातील गुणवत्ता जगाला दाखवून दिली. बीसीसीआयच्या स्पर्धांसोबतच तिने 1992 मध्ये आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे नेतृत्वही केले. लग्नानंतर मुंबईत स्थायिक झाल्याने कल्याणमधील आर्य गुरुकुलमध्ये क्रिकेट प्रशिक्षक म्हणून ती रुजू झाली. शाळेतील युवा खेळाडूंवर क्रिकेटचे संस्कार करीत असतानाच "ऑफ सीझन'मुळे वजन वाढू लागले. त्यामुळे फिट राहण्यासाठी तिने दोन महिन्यांपूर्वी पॉवरलिफ्टिंग करण्याचा निर्णय घेतला. प्रशिक्षक सुरेश कोलकर यांचा तिला "सपोर्ट' मिळाला. नियमित सरावामुळे वजन तर घटलेच, शिवाय या खेळात रुचीदेखील वाढू लागली. अवघ्या दोन महिन्यांच्या कठीण सरावानंतर ठाणे येथे झालेल्या जिल्हा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत नीताने एकूण 185 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावत सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला. त्यानंतर लगेच कल्याण येथे झालेल्या राज्य स्पर्धेत पुन्हा सोनेरी यश पटकाविले. या दुहेरी यशामुळे नीताचा आत्मविश्‍वास वाढला असून, आता याच महिन्यात इडुपी (केरळ)मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेतही महाराष्ट्रासाठी पदक जिंकण्याचा मनोदय तिने बोलून दाखविला. रेशीमबाग मैदानावर राजू कावरे यांच्या मार्गदर्शनात क्रिकेटचे धडे गिरविणारी उंचपुरी नीता दिवसभर बॅट अन्‌ चेंडूशी खेळायची. मैदानाच्या चारही बाजूंनी उंच आक्रमक फटके मारणे तिला आवडायचे. "ग्राउंड शॉट्‌स' खेळत नसल्याने अनेकवेळा तिने प्रशिक्षकांची नाराजीही ओढवून घेतली. पण, नीताने आपला नैसर्गिक खेळ खेळणे सोडले नाही. याच आक्रमकतेमुळे तिला विदर्भ संघात स्थान मिळाले व पुढे हार्डहिटर फलंदाज म्हणून लोकप्रियता दिली. सिव्हिल इंजिनिअर नितीनशी लग्न झाल्यानंतर त्यांना ऐश्‍वर्या नावाची मुलगी झाली. ऐश्‍वर्यानेही आईचा वारसा पुढे चालवित क्रिकेट स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी बजावली. मात्र, 17 व्या वर्षी एका अपघातात ऐश्‍वर्या मरण पावल्याने चाफले परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठी नीताने क्रिकेट अकादमीमध्ये स्वत:ला झोकून दिले. लोकांची शाळा व एस. बी. सिटी कॉलेजची विद्यार्थिनी राहिलेल्या नीताने 2013 मध्ये "क्रिकेटच्या ऐश्‍वर्या' हे महिला क्रिकेटवरील पुस्तक लिहून आपल्या मुलीला समर्पित केले. शिवाय खेळाडू म्हणून दुसरी "इनिंग' धडाक्‍यात सुरू करून अनेकांसाठी प्रेरणास्त्रोतही ठरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com