"कोर्सवर्क'मध्ये "निगेटिव्ह मार्किंग'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

सध्या सुरू असलेल्या "कोर्सवर्क'मध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या बरीच आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाची गुणवत्ता पुन्हा वाढविण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करून तो पुन्हा "टफ' करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच आता कोर्सवर्कमध्ये "निगेटिव्ह मार्किंग' करण्यात येणार आहे

नागपूर - विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पीएच. डी. करताना "कोर्सवर्क' करणे आवश्‍यक असल्याचे निर्देश दिले. येत्या सत्रापासून "कोसवर्क' केल्याशिवाय पीएच.डी.साठी नोंदणी करता येणार नाही. तसा प्रस्ताव विद्यापीठ तयार करीत आहे. मात्र, "कोर्सवर्क'च्या रचनेत विद्यापीठाने पुन्हा बदल केला असून, त्यात "निगेटिव्ह मार्किंग' आणि साठऐवजी चाळीस मिनिटांचा वर्ग घेण्यात येईल.

पीएच.डी. करताना विद्यार्थ्यांना संशोधन पेपर प्रकाशित करणे, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग नोंदविण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय विद्यापीठ अनुदान आयोगाने संशोधकांना 60 तासांचे "कोर्सवर्क' करणे अनिवार्य केले. यापूर्वी विविध महाविद्यालयांतील संशोधन केंद्रात "कोर्सवर्क' घेण्याची परवानगी होती. दरम्यान, "कोर्सवर्क'मध्ये महाविद्यालयांनी विषयांशी संबंधित अभ्यासक्रम तयार करून त्याचे प्रमाणपत्र संशोधकांना दिले जात होते. त्यात कुणी हा "कोर्सवर्क' केला अथवा नाही केला, याची माहिती विद्यापीठाला मिळत नव्हती. त्यामुळे ओळखी किंवा दबावातून हे प्रमाणपत्र मिळविले जात होते. मात्र, विद्यापीठानेच "कोर्सवर्क'चा अभ्यासक्रम तयार केला. त्यामुळे 60 तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यातून कितपत ज्ञान मिळाले हे तपासण्यासाठी विद्यापीठाद्वारे परीक्षाही घेण्यास सुरुवात केली. आता "कोर्सवर्क'साठी विद्यापीठाच परीक्षा भवनात परीक्षा घेण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या "कोर्सवर्क'मध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या बरीच आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाची गुणवत्ता पुन्हा वाढविण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करून तो पुन्हा "टफ' करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच आता कोर्सवर्कमध्ये "निगेटिव्ह मार्किंग' करण्यात येणार आहे. त्यासाठी एका प्रश्‍नाला एक गुण बाद करण्यात येईल. विशेष म्हणजे अभ्यासक्रमातही बदल करण्यात आला असून, वीस गुणांचे "प्रोजेक्‍ट' टप्प्याटप्याने पूर्ण करण्यात येईल शिवाय मराठीतूनही "कोर्सवर्क' पूर्ण करता येणार आहे.

Web Title: Negative Marking to be Introduced