फक्त 35 दिवस पुरेल एवढेच पाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

नागपूर : जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या जलाशयातील पाण्याचा साठा जवळजवळ संपला आहे. तोतलाडोहमध्ये 56 दशलक्ष घनमीटर तर नवेगाव खैरीला 33 दशलक्ष घनमीटर (वापरण्यायोग्य) पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध फक्त 35 दिवस पुरणार असल्याने जिल्ह्याला प्रथमच अभूतपूर्व पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

नागपूर : जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या जलाशयातील पाण्याचा साठा जवळजवळ संपला आहे. तोतलाडोहमध्ये 56 दशलक्ष घनमीटर तर नवेगाव खैरीला 33 दशलक्ष घनमीटर (वापरण्यायोग्य) पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध फक्त 35 दिवस पुरणार असल्याने जिल्ह्याला प्रथमच अभूतपूर्व पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी इतर सर्व कामे बाजूला ठेवून महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले. टंचाईमुळे महापालिकेने एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्थिती आणखी चार महिने राहू शकते. तोतलाडोह जलाशयातून मनपा जलप्रदाय विभागाचे पंप तलावातील पाण्याची पातळी 318 मीटरपर्यंत असताना पाणी खेचू शकतात. ती पातळी 314 मीटरपर्यंत आली आहे. पाणी खेचणाऱ्या पंपाच्या हेडमध्ये तांत्रिक दुरुस्ती करून 311 मीटर पाण्याच्या पातळीपासून या पंपांनी पाणी खेचावे अशी दुरुस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले आहे. नवेगाव खैरीत मात्र 33 दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यायोग्य उपलब्ध असून ते शहराला पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
मध्य प्रदेशातील चौराई जलशयात 94 दशलक्ष घनमीटर पाणी असून आवश्‍यकता भासल्यास दोन्ही शासनाच्या स्तरावर बैठक घेऊन त्यातील 10-15 दशलक्ष घनमीटर पाणी नागपूरसाठी घ्यावे लागणार आहे. ही सर्व वस्तुस्थिती शासनाला कळविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. सध्या असलेले पाणी फक्त पिण्यासाठी शिल्लक ठेवावे लागणार आहे.
व्यावसायिकांवरही बंधने
बांधकाम, वाहने धुणे आदी यासाठी झोननुसार दक्षता समित्या स्थापन करण्यात येणार असून या समित्या पाणीवापरावर नियंत्रण ठेवणार आहेत. मनपाच्या पाणीपुरवठ्यापैकी 30 टक्के पाणी व्यावसायिक वापरासाठी दिले जाते. त्यातही कपात करण्यात येणार आहे. हॉटेल, बारमालक यांच्या पाणीवापरावर बंधने येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new about water crisis