अकोला मार्गे पुण्यासाठी एसी स्लीपरकोच शिवशाही बससेवा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

नागपूर-पुणे ही बस अकोला मार्गे सुरू करण्यात आली आहे. मंगळवार (ता. 15) या गाडीचा शुभारंभ झाला.

अकोला - राज्य परिवहन महामंडळाकडून एसी स्लीपरकोट शिवशाही बससेवा विस्तार करण्यात येत असून नागपूर, नाशिक पाठोपाठ पुणेसाठी स्लीपरकोच बससेवा उपलब्ध झाली आहे. नागपूर-पुणे ही बस अकोला मार्गे सुरू करण्यात आली आहे. मंगळवार (ता. 15) या गाडीचा शुभारंभ झाला.

ही गाडी नागपूर गणेशपेठ बसस्थानकातून सायंकाळी 5 वाजता सुटेल. अकोला येथे रात्री 11:30 वाजता तर पुणे येथे सकाळी 8:40 वाजता पोहोचेल. पुणे येथून ही गाडी सायंकाळी 5 वाजता सुटेल. पहाटे 4 वाजता अकोला येथे तर नागपूरला सकाळी 8:40 वाजता पोहोचेल. अकोला, जालना, औरंगाबाद या मार्गाने ही गाडी पुणे येथे जाईल.

खासगी वाहतुकीला पर्याय -
विदर्भात स्लीपर बसने जाणाऱ्यांना यापूर्वी खासगी वाहतुकीशिवाय पर्याय नव्हता. आता एसटीच्या दररोज फेऱ्या होणार असल्याने प्रवाशांना चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. एसटीकडून वाताणुकूलित स्लीपर सेवा सुरू करण्यात आली आहे. बस सायंकाळी 5 वाजता पुणे शिवाजीनगरहून सुटेल. त्या बसला नागपूरसाठी 1672 रुपये तिकीट आहे. प्रवाशांना बसचे आगाऊ आरक्षण महामंडळाच्या संकेतस्थळावरून करता येईल.

शिवशाहीतील सुविधा -
या बसमध्ये मोफत वायफाय, मोबाईल चार्जिंग प्लग, उशी, ब्लॅंकेट या सुविधेसह प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आगरोधक यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरा या सुविधा आहेत.

तिकीटांचे दर -
शिवशाही एसी स्लीपरकोच बसचे नागपूर-अकोलासाठी 568 रुपये, अकोला-पुणेसाठी 1105 रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत.

शिवशाहीचा विस्तार -
एसटी महामंडळाच्या ताफ्यात दोन हजार शिवशाही बस टप्याटप्याने दाखल होणार आहेत. सध्या 797 शिवशाही बस राज्यातील विविध मार्गावर धावत आहेत. प्रवाशांचा या सेवेला चांगला प्रतिसाद आहे. शिवशाही बसपैकी 150 बस या 30 आसनी स्लीपरकोच शिवशाही असून त्या विशेषकरून राज्यातील विविध शहरातून लांब पल्ल्याच्या अंतरासाठी चालविल्या जाणार आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: New AC Sleeper coach Shivshahi Bus Service Starts via Akola