मेळघाटात आलाय नवा पाहुणा! पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

राज इंगळे | Thursday, 24 September 2020

भारतीय संस्कृतीमध्ये करकोचा पक्षाला मानाचे स्थान आहे. असे मानले जाते की वाल्मिकी वृषींना सारस पक्षाच्या जोडीकडे पाहूनच काव्य सुचले आणि रामायणाची निर्मिती झाली. विशेष म्हणजे हे पक्षी एकाच जोडीदाराबरोबर जीवन व्यतीत करीत असल्याने तसेच मेटिंगच्या वेळी मनमोहक नृत्य करीत असल्याने या पक्षांना प्रेमाचे प्रतीक मानले जाते.

अचलपूर (अमरावती) : घनदाट वनश्रीने विदर्भाचा बराचसा भाग व्यापला आहे. त्यामुळे हा प्रदेश प्राणी पक्षी प्रेमींना नेहमीच खुणावत असतो. इथे वास्तव्यात असलेल्या पक्षांसह अहेक स्थलांतरीत पक्षीही इथे हंगामी येत असतात. मेळघाटच्या जंगलात नदी, तलावावर रंगीबेरंगी विदेशी पक्षांचे आगमन मोठ्या प्रमाणात होत असते. यात काळा करकोचा या विदेशी पाहुण्याने पर्यटकांना चांगलीच भुरळ पाडल्याचे दिसून येत आहे. कोलकास जवळील सिपना, तापी खोऱ्यात काळा करकोचा पर्यटकांचे मन मोहून घेत त्यांना आकर्षित करीत आहे. परिणामी पर्यटकांची पावले व्याघ्रप्रकल्पाच्या जंगलाकडे वळत आहेत.

अतिशय सुंदर व आकर्षक असलेला काळा करकोचा हा पक्षी गेल्या अनेक वर्षांपासून मेळघाटच्या जंगलात आढळून येत असून तो पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. राज्यातील जंगलांपैकी मेळघाट जंगल पक्षांसाठी अग्रणी आहे. या पक्षाचे घरटे उंच झाडावर काटक्‍यांचे बनविलेले असते. करकोचा पक्षाची मादी एका वेळी तीन ते पाच पांढऱ्या शुभ्र रंगाची अंडी देते. हा करकोचा पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार व युरोपमधून मेळघाटच्या जंगलात येत असतो. मेळघाटच्या जंगलातील नद्यांत लहान-लहान मासोळ्यांचा पाहुणचार मिळत असल्याने हा पक्षी कोलकास येथील परिसरात हमखास आढळून येतो. सदर परिसर या पक्षाचे निवासाचे ठिकाण बनले आहे.

करकोचा प्रेमाचे प्रतीक
भारतीय संस्कृतीमध्ये करकोचा पक्षाला मानाचे स्थान आहे. असे मानले जाते की वाल्मिकी वृषींना सारस पक्षाच्या जोडीकडे पाहूनच काव्य सुचले आणि रामायणाची निर्मिती झाली. विशेष म्हणजे हे पक्षी एकाच जोडीदाराबरोबर जीवन व्यतीत करीत असल्याने तसेच मेटिंगच्या वेळी मनमोहक नृत्य करीत असल्याने या पक्षांना प्रेमाचे प्रतीक मानले जाते. राजस्थानमध्ये या पक्षाला अतिशय मानाचे स्थान आहे. तिथे त्यांची शिकार केली जात नाही. असे मानतात की यापैकी एकाची शिकार केली तर तो अथवा ती जोडीदारासाठी झुरून प्राण त्याग करतो. परिणामी या पक्षांची कोणीही शिकार करण्याचा विचारही मनात आणत नाही.

सविस्तर वाचा -  तुम्हाला माहित आहे का झोपेचे गणित? कोणत्या वयात किती झोप घ्यावी? घ्या जाणून

सध्या मेळघाटात मुक्कामाला
मुबलक खाद्य मिळत असल्याने काळा करकोचा सध्या मेळघाटात मुक्कामाला आहे. मेळघाटच्या जंगलातील नदी-नाल्यांत कीटक, मासे मुबलक असतात आणि हेच करकोचाचे प्रमुख खाद्य असल्याने मेळघाटात हा पक्षी नेहमीच आढळून येतो.
सम्राट मेश्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी, व्याघ्रप्रकल्प, कोलकास.

संपादन - स्वाती हुद्दार