यवतमाळात नवे बसस्थानक 11 महिन्यांत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

यवतमाळ : राज्यातील बसस्थानकांच्या नूतनीकरणासाठी शासनाने अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यात यवतमाळ शहरातील बसस्थानकाचेही नूतनीकरण केले जाणार आहे. यासंदर्भात गुरुवारी (ता.11) पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कामाचा आढावा घेतला.

या बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी, यवतमाळचे आगारप्रमुख अविनाश राजगुरे, परिवहन मंडळाच्या कार्यकारी अभियंता शीतल गोंड, नगरविकास विभागाचे सहायक संचालक किरण राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे चंद्रकांत मरपल्लीकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे आदी उपस्थित होते. शासनाने राज्यातील बसस्थानकांच्या नूतनीकरणासाठी 600 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यवतमाळ बसस्थानकाचाही त्यात समावेश आहे. ठेकेदाराला 11 महिन्यांत हे बसस्थानक पूर्ण करावयाचे आहे. मात्र, राज्य परिवहन विभागाकडून संथगतीने काम सुरू आहे. म्हणून परिवहन महामंडळाने ठराविक कालावधीत काम करावे, असे आदेश पालकमंत्री मदन येरावार यांनी दिले. शहरातील बसस्थानक दुसऱ्या जागेवर स्थलांतरित करण्यासाठी जागेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, जेणेकरून बसस्थानक स्थलांतरित झाल्यावर नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात करता येईल. जनतेच्या सोयीसाठी येथील बसस्थानक त्वरित तयार करण्याला प्राधान्य आहे, असेही येरावार यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New bus stand in Yavatmal in 11 months