विदर्भातील मुले शिकणार आता ‘होम स्कूल़'मध्ये...पालकांच्या निरीक्षणात अभ्यासक्रम

अमरावती : अकोला येथील पालक "होम स्कूलिंग' अंतर्गत मार्गदर्शन करताना.
अमरावती : अकोला येथील पालक "होम स्कूलिंग' अंतर्गत मार्गदर्शन करताना.

मांजरखेड (जि. अमरावती) : मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून आज नियमित शाळांसोबत रात्रशाळा, वस्तीशाळा, वीटभट्टी शाळा, वस्तीशाळा आल्या. उच्च शिक्षणासाठी मुक्त विद्यापीठ आले. याच धर्तीवर विदर्भात आता मुलांचे शिक्षण घरच्या घरी व्हावे म्हणून "होम स्कूलिंग'चे नवे कल्चर येत आहे.

या माध्यमातून पालक व गटाच्या माध्यमातून मुलांच्या अंगी सर्जनशीलता वाढीस लागणार असून लहान वयापासून संशोधनाला चालना मिळणार आहे.

अभ्यासक्रम निवडीचे स्वातंत्र्य

"होम स्कूलिंग'(गृह शिक्षण) म्हणजे पालकांच्या मदतीने मुक्तशिक्षण घेणे होय. आज जगातील अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकानंतर भारतातसुद्धा या शिक्षणाला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. सध्या देशात दरवर्षी पाच लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी घरबसल्या शिक्षण घेत आहेत. होम स्कूलिंगमध्ये पालकांना राज्य शिक्षण मंडळासह विविध शिक्षण मंडळांतील अभ्यासक्रम निवडीचे स्वातंत्र्य आहे. परीक्षा देण्याकरिता राष्ट्रीयस्तरावर "एनआयओएस' (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग) कडून पहिली ते तिसरीसाठी "लेव्हल ए', चौथी पाचवीसाठी "लेव्हल बी' व सहावी ते आठवीसाठी "लेव्हल सी'ला प्रवेश घेऊन परीक्षा देऊ शकता.

बालक-पालकांचे गट तयार

राज्यात महाराष्ट्र मुक्त शिक्षण मंडळ अंतर्गत इयत्ता पाचवी, आठवी व दहावीची परीक्षा देऊन नियमित उच्च शिक्षणासाठी प्रवेश करू शकतात.
होम स्कूलिंगला नियमित शाळेप्रमाणे कुठलेही बंधणे नसल्याने मुले आपल्या आवडी व सवडीनुसार शिक्षण घेऊ शकतात. त्याला मार्गदर्शन मिळण्यासाठी आता शहराशहरांत बालक-पालकांचे गट तयार झाले आहेत. महिन्यात दोन-तीन वेळा ते एकत्रित येऊन चर्चा करतात.

सर्वसामान्य विद्यार्थ्यांनासुद्धा होम स्कूलिंग

दिव्यांग, खेळाडू, कलाकार यांना वरदान ठरलेली ही पद्धत आता सर्वसामान्य मुलेसुद्धा स्वीकारत आहेत. शाळेतील कडक शिस्त, वाढलेले भरमसाट शुल्क, अनाकर्षक वातावरण, शिक्षकांची व्यावसायिक वृत्ती या सर्व कारणांमुळे महानगरातील पालक "होम स्कूलिंग'कडे वळले आहेत. भविष्यात कोचिंग क्‍लासेसला पर्याय म्हणून नवीन "टॅलेंट' इकडे वळत आहे.

मुलांचा सर्वांगीण विकास

आम्ही दोघेही डॉक्‍टर आहोत, व्यस्त दिनचर्या असल्यामुळे मुलगी अर्शिताला (वय पाच) शाळेत टाकले तर तिच्यासोबत राहायला मला वेळ मिळाला नसता. त्यामुळे मित्रपरिवार व इंटरनेटवरून माहिती घेऊन घरालाच शाळेचे स्वरूप दिले. ती स्वतः शिकत असल्यामुळे शेतातील सर्व वनस्पतींची माहिती सांगू शकते. होम स्कूलिंगमुळे तिचा आत्मविश्‍वास वाढलेला आहे. यामुळे निश्‍चितच मुलांचा सर्वांगीण विकास होतो, असे अकोट येथील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. गुंजन वालसिंगे (वडनेरे) यांनी सांगितले.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com