esakal | "एमबीए'साठी पुन्हा नव्याने नोंदणी
sakal

बोलून बातमी शोधा

"एमबीए'साठी पुन्हा नव्याने नोंदणी

"एमबीए'साठी पुन्हा नव्याने नोंदणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : सातत्याने न्यायालयाच्या फेऱ्यात असलेल्या एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी मंगळवारी नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वी एमबीए अभ्यासक्रमाचे प्रवेश 28 ऑगस्टपर्यंत थांबविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. सातत्याने उशीर होत असलेल्या प्रक्रियेवर विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त करीत सोशल मीडियावर सरकारच्या धोरणांविरोधात मोहीम सुरू केली होती.
राज्यात दीड महिना उशिरा एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली. यामध्ये पहिल्या फेरीत बोगस गुणांच्या आधारे एमबीए प्रवेश मिळविल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे दुसरी गुणवत्तायादी प्रकाशित होताच हा घोळ निदर्शनास आल्याने प्रक्रिया थांबविण्याचे सीईटी सेलमार्फत देण्यात आले. दुसरीकडे जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटशी जुळलेल्या प्रकरणात गुणवत्ता यादी प्रकाशित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. यानंतर बरेच दिवस प्रक्रिया थांबल्यावर उच्च न्यायालयाने पुन्हा नव्याने प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. प्रक्रिया सुरू होत नाही तोच, प्रथम फेरीतील नोंदणी केल्यानंतर जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट प्रकरणातील विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने प्रक्रियेवर पुन्हा एकदा गंडांतर आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. याबद्दल 200हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रसार माध्यमांना मेल करून प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली. दोन महिन्यांपासून प्रक्रियेत उत्पन्न होणाऱ्या घोळामुळे इंटर्नशिप आणि प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांना मुकावे लागणार काय, अशी भीती विद्यार्थ्यांना वाटू लागली. आता सर्वोच्च न्यायालयातून निकाल आला असून जमनालाल बजाज संस्थेला स्वायत्त संस्था धरून महाराष्ट्रातील 85 टक्के जागा विचारात घेत प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले आहे.
loading image
go to top