जय, जयचंदनंतर उमरेड-कऱ्हांडला येथे नवा पाहुणा

जय, जयचंदनंतर उमरेड-कऱ्हांडला येथे नवा पाहुणा

 उमरेड, वेलतूर : उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात जय, जयचंदची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. त्या दोन्ही वाघांसारखा रुबाबदार व देखणा नवा वाघ पर्यटकांना दररोजच दर्शन देत असल्याने पर्यटक पुन्हा या अभयारण्याकडे वळले आहेत. 
नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही व भिवापूर तालुक्‍याव्यतिरिक्त भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्‍यातील जंगलांना जोडणारे हे अभयारण्य 69.36 चौरस किमी क्षेत्रात पसरले आहे. 2008 मध्ये तत्कालीन मंत्री राजेंद्र मुळक यांच्या प्रयत्नातून हे अभयारण्य पर्यटकांसाठी खुले झाले. सुरुवातीच्या काळात देशी-विदेशी पर्यटकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाल्याने या अभयारण्याचे महत्त्व वाढले. येथील "जय' हा वाघ देश-विदेशात चांगलाच प्रसिद्ध झाला होता. तो अचानक बेपत्ता झाल्यानंतर जयचंद या वाघानेही पर्यटकांना आकर्षित केले. त्यानंतर व्याघ्रदर्शन होत नसल्याने पर्यटकांनी या अभयारण्याकडे पाठ फिरवली. दरम्यानच्या काळात वाघाचे कुटुंब दिसल्याने वनविभागालाही हायसे वाटले होते. 15 ऑक्‍टोबरपासून यंदाच्या हंगामासाठी खुल्या झालेल्या या अभयारण्यात पर्यटकांना व्याघ्रदर्शनाच्या चर्चा होऊ लागल्या. पर्यटकांना दररोज वाघांचे दर्शन होत असल्यामुळे बुकिंग फुल्ल असल्याचे कुही परिसराचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्‍याम ठोंबरे यांनी सांगितले. 
ताडोबा जंगलातून 
अभयारण्यात पोहोचलेला हा नवा पाहुणा ताडोबा जंगलातून आल्याची माहिती देण्यात आली आहे. ताडोबातील टी-13 वाघिणीचा तो बछडा आहे. उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यापासून काही अंतरावरच ताडोबा अभयारण्य असून दोन्ही अभयारण्यांना जोडणारे महसुली जंगलातून मार्गक्रमण करीत तो पोहोचला असावा. या अभयारण्यात या वाघाच्या वास्तव्यासाठी पूरक वातावरण आहे. 
ही समृद्धीची नांदी 
उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात एकूण 10 ते 12 लहान-मोठे वाघ आहेत. 10 ते 15 बिबट याशिवाय हरीण जातीचे वन्यजीव, रानगवे, नीलगाय, रानडुक्कर, रानटी रेडे, पक्षी, सरपटणारे प्राणी येथे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. विस्तीर्ण परिसरामुळे एकाच वेळी 40 किमी परिसरात जंगल सफारी करता येते. हिवाळ्याची सुरुवात होत असल्यामुळे व्याघ्रदर्शनासाठी सुवर्णकाळ ठरत आहे. 
सुविधांचीही गरज 
यंदा पाऊस मुसळधार बरसला असल्याने जंगलातील रस्त्यांवर मोठे खड्‌डे पडले आहेत. त्यामुळे पर्यटकांना ये-जा करण्यास अडसर निर्माण होत आहे. जंगल सफारीदरम्यान महिलांसाठी असलेले स्वच्छतागृह नसल्याने त्यांची कुचंबना होते. तर लहान-मोठ्या समस्या कायम आहेत. त्या दूर करण्याची गरज असल्याचे मत मनीष शिंगणे यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com