...म्हणून दगावले नवजात बाळ, नातेवाइकांचा राडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

महालगाव येथील जिजा योगेश तरोणे या महिलेला प्रसूती उपजिल्हा रुग्णालयात मंगळवार(ता.5) दाखल करण्यात आले होते. बुधवारी(ता.6) रात्री सव्वाबाराच्या सुमारास महिलेची प्रसूती होऊन तिने बाळाला जन्म दिला. त्यावेळी बाळ सुखरूप होते. गुरुवार(ता.7) पर्यंत बाळाची हालचाल होत नसल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रूपेश बडवाईक यांना देण्यात आली.

साकोली (भंडारा) : महिलेची प्रसूती झाल्यानंतर एकदिवसाच्या बाळाचा उपजिल्हा रुग्णालयात आज मृत्यू झाला. येथे बालरोगतज्ज्ञ नसल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी रुग्णालयाबाहेर चांगलाच गदारोळ केला. त्यामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

तालुक्‍यातील महालगाव येथील जिजा योगेश तरोणे या महिलेला प्रसूती उपजिल्हा रुग्णालयात मंगळवार(ता.5) दाखल करण्यात आले होते. बुधवारी(ता.6) रात्री सव्वाबाराच्या सुमारास महिलेची प्रसूती होऊन तिने बाळाला जन्म दिला. त्यावेळी बाळ सुखरूप होते. गुरुवार(ता.7) पर्यंत बाळाची हालचाल होत नसल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रूपेश बडवाईक यांना देण्यात आली. डॉ. बडवाईक यांनी तपासणी केली. मात्र, जेव्हा त्यांनी तपासणी केली तेव्हा बाळाचा मृत्यू होता. 

दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळ दगावले, अशी माहिती होताच महालगाव येथील 30 ते 40 नागरिकांचा जमाव उपजिल्हा रुग्णालयात एकत्र आला. त्यामुळे बराच वेळ या ठिकाणी तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. महिलेचे नातेवाईक व नागरिकांनी साकोली पोलिस स्टेशनवरसुद्धा धडक दिली. महिलेचे पती योगेश तरोणे यांनी बाळाचे शवविच्छेदन करण्याची मागणी केली. 

तेव्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ. रूपेश बडवाईक यांनी येथे बालरोगतज्ज्ञ नसल्याने शवविच्छेदन होणार नाही, जिल्हा रुग्णालयात न्यावे लागेल असे सांगितले. त्यामुळे नागरिकांचा रोष अधिकच वाढला. यावेळी पोलिसांचा ताफा असल्याने परिस्थिती नियंत्रणात होती. महालगाव क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य दीपक मेंढे यांनी याबाबत माहिती होताच घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी योगेश तरोणे व गावातील नागरिकांची समजूत काढून शांत केले. त्यांच्या मध्यस्थीने पोलिस तक्रारही मागे घेण्यात आली. श्री. तरोणे यांनी बाळाचा मृतदेह स्वमर्जीने नेत असल्याने वैद्यकीय अधीक्षकांना लिहून दिले. त्यानंतर हे प्रकरण निवळले. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयातील रिक्तपदे व गैरसोयीबद्दल नाराजी व्यक्त करून येथील समस्या दूर करण्याची मागणी केली. 

अपवादात्मक घटना 
महिलेची प्रसूती झाल्यानंतर बाळाची योग्य काळजी घेण्यात आली. परंतु, अचानक त्याने हालचाल करणे बंद केले. अशा प्रकारच्या घटना अपवादाने घडतात. 
- डॉ. रूपेश बडवाईक 
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय साकोली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: newborn baby died in hospital due to negligence of doctor