न्यूबॉर्न केअर युनिट नवीन जागेत हलविले; विविध विभागांकडून चौकशी सुरू

दीपक फुलबांधे
Tuesday, 12 January 2021

समितीला तीन दिवसांत अहवाल देण्यास सांगितले असले तरी आगीची व्याप्ती व गंभीरता लक्षात घेता चौकशीसाठी आणखी मुदत वाढवून दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयात आगीमुळे न्यूबॉर्न केअर युनिट जळून दहा बालकांचा मृत्यू झाला. आता हे युनिट नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या वॉर्डात स्थानांतरित करण्यात आले आहे. या घटनेची चौकशी विविध विभागांकडून सुरू झाली आहे.

आगीत दहा बालकांचा मृत्यू तर सात बालकांना वाचविण्यात आले होते. आग विझविण्यासाठी सुरक्षा रक्षक व सहकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. त्यानंतर अग्निशमन विभाग तत्काळ घटनास्थळी पोहोचल्यामुळे आगीवर नियंत्रण शक्‍य झाले. या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या नेतृत्वात समिती नेमण्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली होती.

नागपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा

मात्र, दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा भेटीत तायडे यांना हटवून चौकशी समितीच्या अध्यक्षपदी विभागीय आयुक्त संजीवकुमार यांची नेमणूक केली होती. या चौकशीच्या दृष्टीने न्यायवैद्यक तज्ज्ञांची टिम, इलेक्‍ट्रिकल निरीक्षक, व्हीएनआयटी, राष्ट्रीय अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तज्ज्ञ, विद्युत, सार्वजनिक बांधकाम आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

त्याचा अहवाल लवकरच मिळणार आहे, असे जिल्हाधिकरी संदीप कदम यांनी सांगितले. समितीला तीन दिवसांत अहवाल देण्यास सांगितले असले तरी आगीची व्याप्ती व गंभीरता लक्षात घेता चौकशीसाठी आणखी मुदत वाढवून दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अधिक माहितीसाठी - कशी नशिबानं थट्टा आज मांडली!, स्मशानभूमीचा रस्ता अडविल्याने अंत्ययात्रा थांबली, अंत्यसंस्कारासाठी चार तासापासून प्रेत रस्त्यावर

सर्वच सेवा प्रभावित

दरम्यान आगीच्या घटनेपूर्वी युनानी दवाखान्याच्या बाजूला एक वॉर्डचे नव्याने बांधकाम झाले आहे. आता तेथे इन बॉर्न व आउट बॉर्न हे दोन्ही कक्ष स्थानांतरित करण्यात आले आहेत. आगीमुळे रुग्णालयातील सर्वच सेवा प्रभावित झाल्या आहेत. त्या पुन्हा नियमित करण्यासाठी रुग्णालय प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, विद्युत विभागाद्वारे उपाययोजना सुरू आहेत. रुग्णालयातील विजेचे यंत्र व वायरिंग जळाल्याने डायलिसिस सेवा काही दिवसांसाठी बंद ठेवली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हे सुरळीत होण्याची शक्‍यता आहे.

जाणून घ्या - वाघ मालकाला नेत होता ओढत, पण कुत्र्यानं केलेलं कृत्य पाहून मृत्यूच्या दारात असलेला मालकही झाला अवाक्

लवकरच सर्व सेवा सामान्य होण्याची शक्‍यता

जिल्हा रुग्णालयातील ज्या एसएनसीयू युनिटमध्ये आग लागली. त्याच्या जवळच डायलिसिस सेंटर आहे. आगीत तेथील यंत्रसामुग्रीचे नुकसान झाले आहे. डायलिसिस सेंटरच्या दुरुस्तीचे काम बांधकाम विभाग व इलेक्‍ट्रिकल विभागाने सुरू केले आहे. न्यूबॉर्न केअर युनिटचे नवीन वॉर्डमध्ये स्थानांतर करण्यात आले असून, लवकरच सर्व सेवा सामान्य होण्याची शक्‍यता वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल डोकरीमारे यांनी व्यक्त केली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newborn care unit moved to new space Bhandara Hospital fire news