प्रियकराची पतीला ओळख करून दिली अन्...

couple
couple

नागपूर : लग्न झाल्यानंतर पतीसह पहिल्यांदा माहेरी आलेल्या नववधूने बसस्थानकावर प्रियकराची पतीला ओळख करून दिली. त्यानंतर लघुशंकेला जाण्याचा बहाणा करून दुचाकीने प्रियकरासह पलायन केले. बसस्थानकावर पत्नीची परत येण्याची वाट पाहत असलेल्या पतीला तासाभराने हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी पतीच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी पत्नीच्या प्रियकराविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. अमोल डोंगरे (वय 25, इंदिरा नगर, अजनी) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगरात राहणारी 20 वर्षीय स्नेहा (बदललेले नाव) हिचे अजनीत राहणाऱ्या अमोलवर प्रेम होते. गेल्या तीन वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध असल्याने वस्तीत चर्चा होती. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, जात-पात आणि कुटूंबीयांचा विरोध असल्याने लग्न करू शकले नाही. स्नेहाने याबाबत कुटूंबीयांशी चर्चा केली असता लग्नास स्पष्ट विरोध दर्शविला होता. आईवडीलांनी शेवटी पर्याय नसल्यामुळे स्नेहाचा विवाह झटपट उरकविण्याचे ठरवले. स्नेहाच्या आईवडीलाने बदनामी होण्यापूर्वीच राजनांदगाव-छत्तीसगढ येथील नोकरीवर असलेल्या शिवा (बदललेले नाव) याच्याशी करून दिले. गेल्या 24 एप्रिलला मोठ्या धुमधडाक्‍यात स्नेहाचे लग्न शिवाशी झाले. नोकरीवाला पती मिळाल्यानंतर स्नेहा खूश होईल आणि प्रेमप्रकरण विसरून जाईल, असा समज आईवडीलाचा होता. मात्र झाले उलटेच. पतीकडे नांदायला गेलेल्या स्नेहाचा जीव अमोलसाठी कासावीस झाला होता. फोनवरून दोघेही संपर्कात होते. 

पुन्हा बहरले प्रेम 
शिवा आणि स्नेहा लग्नानंतर 14 मे ला पहिल्यांदा माहेरी नागपुरात आले. येताच तिने लगेच अमोलची भेट घेतली. चार दिवस माहेरी मुक्‍काम असल्यामुळे अमोल आणि स्नेहाचे प्रेम पुन्हा बहरले. मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून दोघेही फिरायला जाणे किंवा एकांतात गप्पा करण्यासाठी जात होते. एकमेकांशिवाय जगू शकत नसल्यामुळे दोघांनी पुन्हा सोबत राहण्याचा निर्णय घेतला. 

असा रचला कट 
शनिवारी सकाळी दहा वाजता स्नेहा पतीसह रेल्वेस्थानकावर गेली. तेथे अमोल आला. स्नेहाने त्याची पतीशी "भैया' म्हणून ओळख करून दिली. रेल्वे दोन तास उशिरा असल्याचे अमोल सांगून बसने जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तिघेही बसस्थानकावर आले. स्नेहाने लघुशंकेला जात असल्याचे पतीला सांगितले. थोड्या वेळात अमोलही गायब झाला. दोघेही दिसत नसल्यामुळे पती बसस्थानकासमोर आला. समोरच स्नेहाला दुचाकीवरून पळवून नेताना अमोल दिसला. प्रकार लक्षात येताच त्याने गणेशपेठ पोलिसात तक्रार केली. 

माझी बायको आणून द्या 
"माझे बायकोवर खूप प्रेम आहे...प्लीझ.. मला माझी बायको आणून द्या' अशी आर्त विनवणी शिवा पोलिस ठाण्यात करीत होता. दुसरीकडे स्नेहाला पतीसोबत राहायचे नसल्याने तिने प्रियकरासोबत पळ काढला होता. त्यामुळे पोलिसांसमोर मोठा पेच पडला होता. आता काय करावे ? या विचारात पोलिसांनी स्नेहाच्या माहेरी माहिती दिली आणि ठाण्यात बोलावून घेतले. स्नेहा आणि अमोलचा शोध सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com