समाजसेवेसाठी 55 "निर्माणी' होताहेत सज्ज

file photo
file photo

गडचिरोली : माझ्या शिक्षणाचा मूळ हेतू काय, माझ्यातील कौशल्याचा समाजातील आव्हाने व प्रश्‍न सोडवण्यासाठी उपयोग करता येईल का, मी नक्की काय हेतू घेऊन जन्माला आलो, समाजातील प्रश्‍नांवर काही करावे असे वाटते पण नक्की काय आणि कसे करावे? असे अनेक प्रश्‍न युवकांना भेडसावतात. अशा प्रश्‍नांची उत्तरे शोधणाऱ्या आणि फक्त पैसे कमावणे हे आयुष्याचे ध्येय न मानता समाजातील प्रश्‍न आव्हान म्हणून स्वीकारण्यासाठी 55 "निर्माणी' वैद्यकीय युवा सज्ज झाले आहेत.
निर्माणच्या नवव्या सत्राचे दुसरे शिबिर 3 ते 11 ऑगस्ट या कालावधीत धानोरा तालुक्‍यातील सर्च संस्थेच्या शोधग्राममध्ये होत आहे. भारतभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील 55 युवा यात सहभागी होणार आहेत. आरोग्य क्षेत्रातील समस्यांबद्दल, त्यांच्या जटिलतेबद्दल कुतूहल आणि बौद्धिक समज युवांमध्ये निर्माण करणे, आरोग्य क्षेत्रात सामाजिक योगदान देण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग समजून घेणे, वेगवेगळ्या रोल मॉडेल्सच्या प्रवासातून सामाजिक कृती करण्याचे धाडस निर्माण करणे, आरोग्य क्षेत्राच्या परिघाबाहेरील सामाजिक-आर्थिक-राजकीय वास्तवाची ओळख करून घेणे आणि या विविध टप्प्यांमधून जाताना "मी जीवनात आता काय करू' या निर्णयापर्यंत शिबिरार्थींना पोहोचवणे हा शिबिराचा मुख्य उद्देश आहे. शिबिरात टाटा ट्रस्टचे लक्ष्मण सेतुरामन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्रायबल हेल्थ, जबलपूर येथील वरिष्ठ संशोधक डॉ. तपस चकमा युवांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर नवजात मृत्यू रोखण्यासाठी सर्चने केलेल्या कामाविषयी पद्मश्री डॉ. अभय बंग मार्गदर्शन करणार आहेत.
असंसर्गजन्य रोग आणि सार्वजनिक स्तरांवरील लकव्याच्या नियंत्रणासाठी सर्चने केलेल्या प्रयोगांविषयी डॉ. योगेश कालकोंडे, अर्थव्यवस्था, बाजारीकरण आणि उपभोक्तावाद याविषयी सुनील चव्हाण युवांशी संवाद साधतील. गडचिरोलीतील मानसिक आरोग्य आणि स्वतःचा प्रवास मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आरती बंग उलगडणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देलनवाडी, रांगी, पेंढरी या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर काम करत असलेले डॉ. मृदुला भोईर, डॉ. हर्षा नन्नावरे आणि डॉ. अभिषेक मारबडे या निर्माणी डॉक्‍टरांना भेटून त्यांचा अनुभव जाणून घेत प्राथमिक आरोग्य केंद्रांवर काम समजून घेण्याचा प्रयत्न शिबिरार्थी करणार आहेत.

"निर्माण'मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
आजपर्यंत निर्माणच्या 9 तुकड्या झाल्या आहेत आणि निर्माणची 10 वी तुकडी लवकरच सुरू होत आहे. यासाठीची निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत होत असते, पहिला टप्पा प्रवेश अर्ज आणि दुसरा मुलाखतीचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त 200 जणांची निवड होईल. अर्ज करण्याची लिंक निर्माणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com